जिल्ह्यातील नवीन कामांचे प्रस्ताव तात्काळ मान्यतेसाठी सादर करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा येथील जिल्हाधिकार्यालयात आज जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-24 अंतर्गत दायित्व निधी मागणी व नवीन कामांचे प्रस्ताव लवकरात लवकर मान्यतासाठी सादर करावेत व प्रशासकीय मान्यता घेऊन ऑगस्ट 2023 पर्यंत कामाची वर्क ऑर्डर तयार ठेवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सातारा येथे पार पडलेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डूडी म्हणाले की, अधिकाऱ्यांनी ज्या गावांमध्ये अंगणवाडीला स्वत:ची इमारत नाही अशांची यादी तयार करावी तसेच ज्या ठिकाणी जागेची अडचण असल्यास त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावा. जिल्हा परिषदेंच्या शाळा परिसरमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध आहे का? याची तपासणी करावी. जिल्हा परिषद शाळांसाठी क्रीडांगण व व्यायाम शाळा निर्माण करावयाची आहेत. त्याचे प्रस्तावही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी यांचेकडे तात्काळ द्यावेत.

प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही जलदगतीने करावी आणि ज्या विभागांनी प्रशासकीय मान्यता घेतली नाही अशा विभाग प्रमुखांची पुन्हा 20 जुलै 2023 बैठक घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डूडी यांनी सांगितले. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-2024 अंतर्गत मंजूर तरतूद, सन 2022-2023 आणि त्या पूर्वीचे दायित्व व 2023-24 अंतर्गत प्रशासकीय मंजुरी व निधी वितरणासाठी सादर केलेल्या प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला.