सातारा प्रतिनिधी | जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील विविध प्रशासकीय कार्यालयांना भेटू देऊन कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान, त्यांनी तहसीलदार, नगरपंचायत कार्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
प्रशासकीय इमारतीत आगमन होताच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे प्रांताधिकारी विकास व्यवहारे, तहसीलदार हनमंत कोळेकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नायब तहसीलदार सुनील मुनाळे, महसूल नायब तहसीलदार निसार शेख, निवडणूक नायब तहसीलदार जयश्री मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक महसूल अधिकारी संजय बैलकर व कर्मचारी उपस्थित होते. पाटील यांनी तहसील कार्यालयाची माहिती घेत अभिलेख कक्ष, एकात्मिक नागरी सुविधा केंद्र तथा सेतू, पुरवठा विभाग व महसूल शाखा आदींची पाहणी करून कामकाजाची बारकाईने माहिती घेतली.
यावेळी पाटील यांनी राज्य सरकारच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हा अव्वल येण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी, असे आवाहन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी पाटील यांनी मेढा नगरपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी स्वागत केले. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, कुसुंबी व ओझरे जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन अडीअडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.