सातारा प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. जनतेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवून हा जनता दरबार विविध विभाग प्रमुखांनी समन्वयातून यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण तालुक्यात होणाऱ्या जनता दरबार तयारी विषयी आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनंसरक्षक आदिती भारद्वाज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, नागरिकांची जी कामे प्रशासनाकडे प्रलंबित आहेत ती जनतेमध्ये जावून मार्गी लावावीत. यामुळे प्रशासनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल. यासाठी अधिकाऱ्यांनी यंत्रणा सक्षम करावी. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जनता दरबरासारख्या उपक्रमांमध्ये क्षमतेची पोहचपावती मिळते. जनता दरबारात येणाऱ्या तक्रारींचा निपटारा जाग्यावरच करावा. शासकीय यंत्रणेत काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही लोक सेवक आहे. त्यामुळे चांगले काम करुन आपल्या पदाला न्याय द्यावा.
चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करणारा सातारा जिल्हा आहे. जनता दरबार हा अत्यंत चांगला पण तितकाच परिश्रमपूर्वक राबवावा लागणारा उपक्रम आहे. यासाठी प्रत्येक जिल्हास्तरीय यंत्रणांनी आपआपल्या यंत्रणांची बैठक घ्यावी, शासकी नियम काटेकोरपणे पाळूनही गरजु लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देता येतो त्यामुळे लोकांना लाभ देत असतांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी केल्या.