सातारा लोकसभा निवडणूकीची मतमोजणी अशा प्रकारे केली जाणार; जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ४५ सातारा लोकसभा मतदार संघातील (Satara Lok Sabha Election) सर्व विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया दि. ४ जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गोडाऊन एम.आय.डी.सी. कोडोली सातारा येथे मतमोजणीस सुरुवात होणार असून मतमोजणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले.

साताऱ्यात निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सकाळपासून सुरुवात होणार असून मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्या होणार आहेत. सायंकाळी सहा ते सातपर्यंत निकाल घोषित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जाणार आहे. तसेच या मातमोजणीदरम्यान ५८४ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण सहा मतदारसंघाचा समावेश आहे. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण, कराड उत्तर आणि कराड दक्षिण हे मतदारसंघ येतात. या सर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची प्रत्येकी २० टेबलवर मतमोजणी होणार आहे. तर सातारा आणि वाई विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या प्रत्येकी २३ मतमोजणी फेऱ्या होतील. पाटण विधानसभा मतदारसंघात २१, कोरेगाव १८, कराड उत्तर १७ आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी १६ मतमोजणी फेऱ्या होणार असल्याची माहिती जितेंद्र डूडी यांनी दिली.