सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नंबर १ शाळेस नुकतीच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली. यावेळी शाळा भेटीत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी शैक्षणिक गुढी उभारून श्रीफळ वाढविण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहीर, नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे, सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड, मुख्याध्यापिका सुनीता यादव, शिक्षिका केशर माने, रश्मी फासे, मनीषा बोराटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकांनी या उपक्रमाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली, तसेच इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे पालकांसह फेटा बांधून, गुलाबपुष्प, वही आणि पेन देऊन औक्षण करत स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शालेय उपक्रम व विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती घेतली. इयत्ता पाचवीतील साहिल दडस या विद्यार्थ्याने इंग्रजी भाषेत शालेय परिसराची माहिती देत प्रभावित केले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तीन महिन्यांत शाळेत झालेल्या सकारात्मक बदलांची तसेच ‘व्हिलेज गो टू स्कूल’ या उपक्रमाच्या यशस्वितेची माहिती घेतली, तसेच विविध माध्यमातून मिळालेल्या आर्थिक आणि वस्तुरूपातील लोकसहभागाबद्दल विशेष कौतुक केले. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला बाजीप्रभू देशपांडे यांचा शाहिरी पोवाडा जिल्हाधिकाऱ्यांनी मन लावून ऐकला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने प्रभावित होऊन जिल्हाधिकारी पाटील यांनी स्वतः ५०० रुपयांचे बक्षीस देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणाच्या लिखित नोंदींचा दस्तऐवज जिल्हाधिकाऱ्यांना भेट म्हणून देण्यात आला.