खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज; खत पुरवठ्याबाबत काटेकोर नियोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयात खरिप हंगाम प्रमुख हंगाम आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असुन पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. जिल्हयात १२९.२० मि.मि पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आजअखेर ४१८५.४५ हेक्टरवर खरिप पिकांची पेरणी झाली आहे. खरिप हंगामावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त असल्याने खतांना मोठया प्रमाणावर मागणी असते. जिल्हयातील खरिप हंगाम यशस्वी करण्यासाठी खत पुरवठयाचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

कृषि विभागामार्फत कृषि उन्नती योजना, अन्न व पोषण अंतर्गत सोयाबीन पिकासाठी ग्रामबीजोत्पादन अंर्तगत ६० टक्के अनुदानावर सोयाबिनचे बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. सदर बियाणेसाठी २० रुपये प्रती किलोप्रमाणे अनुदान असुन ६० रुपये किलो प्रमाणे शेतकरी हिस्सा भरुन बियाणे डिलर मार्फत उपलब्ध आहे. सदर बियाणे परमिटवर देण्यात येत असुन ७/१२ व आधारकार्ड घेऊन शेतकऱ्यांनी तालुका कृषि कार्यालयातून परवाना प्राप्त करुन घ्यावा व संबधित वितरकाकडुन बियाणे प्राप्त करुण घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्हयातील शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध होण्यासाठी युरिया २८०० टन व डिएपी खताचा ५०० मे.टन संरक्षित खत साठा विकेंद्रित पध्दतीने करण्यात आला आहे. जिल्हयात सर्व रासायनिक खतांचा पुरवठा नियमित असुन शेतकऱ्यांनी विशिष्ठ कंपनीच्या संयुक्त किंवा मिश्र रासायनिक खताचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध खतांचा वापर केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेता येणार आहे.

जिल्ह्यात ९५ हजार २६२ टन खत उपलब्ध

खरिप हंगामासाठी जिल्हयात १ लाख ३६ हजार मे.टन खताची आवश्यकत भासत आहे. आज अखेर ९५ हजार २६२ टन खत उपलब्ध आहे. तर जिल्हायात एकुण २९३०९.८१ क्विं.बियाणे उपलब्ध आहे. शेतकरी बांधवानी विशिष्ठ कंपनी किंवा वाणाच्या बियांण्याचा आग्रह न धरता दर्जेदार बियाणे वापरावे ,असे आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना योग्य सेवा न दिल्यास कडक कारवाई करणार

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व औषधे खरेदी करताना नामांकित कंपनीचा आग्रह धरावा तसेच पक्के बिल घ्यावे जेणेकरुन शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही. निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य सेवा न दिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी दिली.

खरिप हंगामातील उपलब्ध बियाणे क्विंटलमध्ये

1) खरिप ज्वारी – 882.28, 2) बाजरी – 845.00, 3) भात – 736785, 4) भूईमूग – 67.40,5) सोयाबीन – 14054.86, 6) सूर्यफुल – 4.00, 7) घेवडा – 1658 .00, 8) मका – 1987.92, 9) उडिद – 201.80, 10) मूग – 259.00, 11) तूर – 31.70, 12) वाटाणा – 1960. 00, एकुण – 29309.81

खरिप हंगामामध्ये खत उपलब्ध

१) युरिया – ३७४५६ मे.टन,
२) डिएपी – ६२६१ मे.टन,
३) एमओपी – ४७२१ मे.टन,
४) एसएसपी – १०४४८ मे.टन,
५) संयुक्त खत – ३६३७६ मे.टन,
६) एकुण – ९५२६२ मे.टन,

कृषि विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी १२ भरारी पथके नियुक्त

शेतकऱ्यांची अडवणुक न होता, त्यांना खते आणि बियाणे योग्य किंमतीत मिळावीत यासाठी कृषि विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी १२ भरारी पथके नियुक्त केले आहेत. जिल्हायातील सर्वच खत, बियाणे, व किटकनाशके विक्री दुकानांची तपासणी करण्याची मोहिम कृषि विभागाने हाती घेतली आहे. यामध्ये दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

या’ क्रमांकावर करता येणार थेट तक्रार

जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.या पथकामध्ये कृषि विभाग व जिल्हा परिषद कृषि विभाग, वजन मापे निरीक्षक यांचे प्रतिनिधी आहेत. निविष्टाबाबत काही तक्रार असल्यास नोंदवण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवण्यात आली आहे. तसेच कृषीमंत्री यांनी दिलेल्या सुचनेनुसार मोबाईल व्हॉटसॲप क्रं. ९८२२६६४४५५ वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन

सातारा जिल्हयामध्ये कृषि निविष्ठाबाबत कोणतीही तक्रार असल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाची सकाळी ८.०० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत संपर्क ७४९८९२१२८४. क्रमांक संपर्क साधावा, असे अवहान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.