सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) चा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात दि. 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी डूडी यांनी निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती दिली. ‘आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.
यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, निवडणूक कार्यक्रमानुसार 45- सातारा लोकसभा मतदारसंघासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करणे सर्व राजकीय पक्षांना व सर्व उमेदवारांना बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने आचारसंहितेचे उल्लंघन केलेस कडक कारवाई केली जाणार आहे. 43 ठिकाणी SST-113 तसेच FST-99 पथके सर्व मतदार संघात कार्यान्वित करणेत येत आहेत. निवडणूकीचे अनुषंगाने जिल्हयामध्ये कोणत्याही प्रकारे पैशाचा व बळाचा गैरवापर होऊ नये याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच आर्थिक व वस्तू स्वरुपातील प्रलोभनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सदर गोष्टी रोखण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
1) अधिसूचना प्रसिध्दी – शुक्रवार दि. 12 एप्रिल 2024
2) उमेदवारी अर्ज दाखल करणे दि. 12 ते 19 एप्रिल
3) अर्जाची छाननी – शनिवार दि. 20 एप्रिल 2024
4) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – सोमवार दि. 22 एप्रिल 2024
5) मतदानाची तारीख – मंगळवार दि. 7 मे 2024
6) मतमोजणीची तारीख – मंगळवार दि. 4 जून 2024
निवडणूक काळात पथकांची नियुक्ती
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैद्य पैसे वाहतूक,पैशाचा गैरवापर, मद्य, व इतर अंमली पदार्थ किंवा इतर प्रलोभने रोखण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार असे गैरप्रकार आढळलयास सक्त कारवाई करण्यात येईल. संशयित बँक व्यवहाराबाबतची यादी बँकेने रोजच्या रोज कळवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डूडी यांनी दिले.
स्विपबाबत जनजागृती
स्विप कार्यक्रमांतर्गत मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील 134 विविध महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचे मतदान नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच पथनाट्ये, भारूड, कीर्तन व विविध लोककलेच्या माध्यमातून मतदान जास्तीत जास्त करण्याबाबत प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. तसेच विविध मतदान जनजागृतीच्या जाहिराती शासकीय महामंडळाच्या बसेस वर लावण्यात येणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत.