कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरात कुणबीच्या नोंदी तपासणीला सुरुवात झाली आहे. सोमवारी सायंकाळी कराड तालुक्यातील पहिल्या कुणबी दाखल्याचं वितरण प्रांताधिकारी अतुल मेहेत्रे आणि तहसीलदार विजय पवार यांच्या हस्ते अमित जाधव (तासवडे) यांना करण्यात आलं. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.
अमित जाधव यांना कुणबी दाखला वितरित करण्यात आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी तहसील कार्यालयाबाहेर येऊन ‘एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या’.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभर आंदोलनांचा धडाका सुरू झाल्यानंतर सरकारने कुणबी नोंदी तपासणीचे आदेश दिले त्यानुसार महसूल यंत्रणेच्या पातळीवर दररोज कुणबीच्या नोंदी तपासल्या जात आहेत. कुणबी दाखल्यासाठी प्रस्ताव दाखल करणाऱ्यांच्या पुराव्यांची तपासणी करून आवश्यक ती पूर्तता पूर्ण करणाऱ्यांना कुणबी दाखले वितरणास सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे.
आतापर्यंत सापडल्या साडे नऊ हजार नोंदी
कुणबी नोंदणी तपासणीला सुरुवात झाल्यापासून ते १ डिसेंबर पर्यंत साडेतीन लाखांहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ९ हजार ६९९ इतक्या कुणबीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. नोंदी तपासणीचे काम अखंड सुरू आहे. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी नोंदी तपासणीमध्ये हयगय होऊ दिलेली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दोन्ही अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.