रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी येईल – उपसंचालक महेंद्र ढवळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | रेशीम शेती व्यवसाय शेतीस पूरक व्यवसाय म्हणून न करता तो मुख्य व्यवसाय म्हणून करावा. रेशीम शेती हा शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शाश्वत पर्याय आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या अडीअचणी दूर होतील. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या जीवनात समृध्दी येईल त्यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी असे आवाहन रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले.

रेशीम संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे विभागस्तरीय रेशीम रत्न पुरस्कारांचे प्रदान यशस्वी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना यशदा येथे आयेाजित कार्यक्रमात श्री.ढवळे यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोचरेकर, प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक संचालक कु.डॉ.कविता देशपांडे, कृषी विभागातील प्रक्रिया विभागाचे उपसंचालक सुनिल बोरकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पवार, अधीक्षक अविनाश खडसने यावेळी उपस्थित होते.

रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे असे सांगून या योजनांचा लाभ घेऊन मोठया संख्येने शेतकरी लखपती झाले असल्याचे श्री.ढवळे म्हणाले. आज रेशीम उद्योगातील शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनाविषयी शास्त्रोक्त माहिती होण्यासाठी एका क्लिकवर रेशीम नकाशा तयार करण्यात आला आहे. याचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी रेशीम रत्न पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रवास रेशीम पिकाची काडी लावण्यापासून माडीपर्यत व माडीपासून गाडीपर्यत आणि आता तर परदेशवारी असा प्रवास होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

रेशीम उत्पादनात अडचणी असल्या तरी त्या फक्त काही काळासाठी असतात, त्यासाठी शासनातर्फे वेळोवेळी मदत करण्यात येते. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून त्यांचे उत्पन्न वाढीसाठी शासन नेहमी मदत करते, त्यासाठी रेशीम शेती करावी असे आवाहन केले. पुढील काळात राज्यात सुमारे पन्नास हजार एकरावर रेशीम शेती करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात येईल असे श्री.ढवळे यांनी सांगितले.

राज्यात अनेक शेतकरी रेशीम शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पादन घेत आहेत. रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शेतीची कामे करताना त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी धुरळणीसाठी आरोग्य किट आणि विविध साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्याची मागणी करत आहे. याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन श्री.ढवळे यांनी दिले.

वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोचरेकर म्हणाल्या की, मनुष्यबळाच्या बाबतीत रेशीम विभाग इतर विभागाच्या तुलनेत मागे आहे. रेशीम शेतीला पुढे नेण्यासाठी वाढीव मनुष्यबळाला मंजूरी मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात येईल.

श्री. सुनिल बोरकर म्हणाले की, रेशीम शेतीमध्ये चांगले उत्पन्न मिळते. त्यासाठी युवकांनी नोकरीच्या मागे न लागता रेशीम शेतीकडे वळावे. अल्प कालावधीमध्ये शेतकऱ्यांना लाखामध्ये उत्पन्न मिळत असून हे यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे. श्री.सुनिल पवार रेशीम उत्पादकांनी ई-नाम या पारदर्शक प्रणालीचा रेशीम विक्रीसाठी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

सहायक संचालक कु.देशपांडे यांनी प्रास्ताविकामध्ये रेशीम संचालनालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजना, रेशीम शेतीचे फायदे, नवीन तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी सूत्रसंचलन केले तर रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी आभार मानले.उच्च व तंत्रशिक्षण तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा अभिनंदनपर संदेश वाचून दाखविण्यात आला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विभागात सर्वाधिक उत्पन्न घेतलेल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार रुपये अकरा हजार, द्वितीय साडे सात हजार, तृतीय पाच हजार तसेच शाल, साडी व प्रमाणपत्र असे स्वरुप होते. रेशीम संचालनालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पुणे विभागातील रेशीम रत्न पुरस्कार्थी जिल्हा व शेतकरी

पुणे – राहुल डोईफोडे, अमोल चांदगुडे, हनुमंत गरगडे

सांगली – बाबासाहेब निकम, अशोक चिप्रीकर

सातारा – प्रमोद विष्णू भोसले, सुमन प्रकाश खाडे पाटील, सुनिल कराडे,

सोलापूर – जयश्री पाडुंरग विर, रामा पालवे, विनोद केचे

कोल्हापूर – शिवाजी जगताप, सुभाष पाटील, विश्वास खोत

अहमदनगर – विजय जाधव, गोविंद गोरे, बाबासाहेब डोळे,

नाशिक,जळगाव – पंडित भोये, वैशाली राजेश पाटील, माधव हागवणे, मधुकर पाटील

उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कारप्राप्त अधिकारी, कर्मचारी

कु.डॉ. कविता देशपांडे, प्रादेशिक सहायक संचालक, अविनाश खडसाने, अधीक्षक, रेशीम विकास अधिकारी विनित पवार, प्यारसिंग पाडवी, बापू कुलकर्णी, राजेश कांबळे, संजय फुले, पोपट इंगळे, संदिप आगवणे, भगवान खंडागळे. वरिष्ठ क्षेत्र सहायक कमलेश हजारे, दिलीप आमराळे, प्रथमेश शिर्के, पवन कळमकर, चंद्रकांत पाटील, सुनिल पाटील, विजय दळवी, बाळासाहेब माने, शाम मैंडकर, सारंग सोरते, शिवानंद जोजण, श्रीकृष्ण गुरव, सुरेश खरुडे.