वाईतील ‘इतक्या’ मधु पालकांना 348 मध पेट्यांसह साहित्याचे वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि मुकुल माधव फाउंडेशन (फिनोलेक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने जोर तालुका वाई येथील 58 मधु पालकांना नुकतेच मंडळाच्या मध संचालनालय महाबळेश्वर मार्फत दहा दिवसाचे निवासी मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये 48 पुरुष व दहा महिलांचा सहभाग होता. या सर्व प्रशिक्षणार्थींना आज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मध संचालनालय महाबळेश्वर आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 348 मध पेट्या आणि मधमाशा पालन व्यवसाय लागणाऱ्या मध यंत्रे, स्टॅन्ड, यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जोर या गावी मध संचालनाचे संचालक दिग्विजय पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश मिरजकर, मुकुल माधव फाउंडेशन यांचे प्रतिनिधी संतोष शेलार, मध निरिक्षक शंकर खंदारे, सचिव लकेरी तसेच गावातील ग्रामस्थ व मधु पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोर या गावात दोन तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे गावचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये मध पेट्या आणि मधमाशा वाहून गेल्या होत्या. गावात व आजूबाजूच्या परिसरात मधमाशा पालन व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर जंगल व पोषक वातावरण असूनही मधुपालकाकडे मध पेट्या नसल्याने मध पाळामध्ये नाराजीचे वातावरण होते व येथील मध उद्योग संकटात आला होता. यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थांची वारंवार खादी ग्रामोद्योग मंडळाकडे मागणी होत होती. त्यानुसार मुकुल माधव फाउंडेशन मदत करायला पुढे सरसावले.

ग्रामस्थांचा स्वगुंतवणूक 50 टक्के वाटा हा मुकुल माधव फाउंडेशन ने उचलला आणि महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मार्फत 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात आले व शंभर टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला. शासनाच्या मध केंद्र योजनेतून जोर ता.वाई येथील 58 मधुपालकांना 348 मध पेट्या, 12 मध यंत्र, 58 मध साठवणूक ड्रम, स्टँड 200, स्वार्मनेट, बी व्हेल, हाईव टूल सूरी प्रत्येकी 58 नग इत्यादी मध उद्योग साहित्य सुमारे रु. 19 लाख इतक्या रक्कमेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.

मंडळामार्फत या लाभार्थींची सेंद्रिय मध उत्पादक म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. मधु पालकांनी उत्पादित केलेला सर्व मध महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ हमीभावाने खरेदी करणार असल्याची माहिती मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील यांनी या वेळी ग्रामस्थांना दिली. मध पेट्या वाटप केल्याबद्दल ग्रामस्थांनी मुकुल माधव फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे आभार मानले.

यावेळी अरुण लक्ष्मण कदम, वैशाली समीर यादव ( पोलीस पाटील )सुरेश चंद्रकांत यादव, चंद्रकांत राजू यादव, महादेव कृष्णा सपकाळ, अनिता शंकर धानवले, सखाराम किसन यादव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. मध साहित्याचा उपयोग करून व्यवसाय लवकरात लवकर सुरू करावा, असे आवाहन संतोष शेलार यांनी केले. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश मिरजकर यांनी प्रास्ताविक केले. निरीक्षक शंकर खंदारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.