कराड प्रतिनिधी | सहकारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या प्राथमिक सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतीच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे प्राथमिक सहकारी सोसायटी हा सहकारचा मुख्य पाया असल्याचे प्रतिपादन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले. कापील विकास सेवा सोसायटीच्या शताब्दी पूर्ती निमित्त सभासदांना भेटवस्तू, वाहन वितरण आणि ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा.चेअरमन शिवाजी जाधव, बाजार समिती सभापती विजयकुमार कदम, उपसभापती संभाजी चव्हाण. कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, प्रा. धनाजी काटकर,ॲड. शंकरराव लोकरे, चेअरमन दीपक जाधव, जगन्नाथ मोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, कापील विकास सेवा सोसायटीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व कालखंडात झाली असून या सोसायटीने जिल्ह्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे. संस्थेचा खत विभाग, धान्य विभाग ,अत्यंत काटकसरीने चालवून सभासदांना उत्तम सेवा दिली आहे . संस्थेची वार्षिक उलाढाल पाच कोटींची असून संस्थेने चांगला नफा मिळवलेला आहे. ज्येष्ठ सभासदांच्या मार्गदर्शनामुळे संस्था प्रगतीपथावर आहे. कापील गावामध्ये तरकारी (भाजीपाला) पिके जास्त प्रमाणात घेतली जातात. त्यासाठी कमी कालावधीचे कर्ज वितरण करण्याबाबत संस्थेने जिल्हा बँकेशी विचार विनिमय करून शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. कारभारात राजकारण न आणता संस्था प्रगतीपथावर ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रकाश पाटील-सुपनेकर, विजयकुमार कदम, प्रा. धनाजी काटकर, शिवाजी जाधव यांची भाषणे झाली. पिनू जाधव यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास कोयना दूध संघाचे संचालक, कराड खरेदी विक्री संघाचे संचालक, शेती उत्पन्न बाजार समिती संचालक, कोयना बँकेचे संचालक तसेच कापील गावातील ज्येष्ठ नागरिक, संस्थेची सभासद उपस्थित होते.