कराड प्रतिनिधी । राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने अंगणवाडीतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांना यशस्वीपणे ही मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या आहेत. त्यानुसार कराड शहरात ही मोहीम राबविण्यात आली असून लहान मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार अंगणवाडीसह विविध शाळांमध्ये या गोळ्यांचे वाटप झाले.
कराड पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील अंगणवाडी क्रमांक ६८, अंगणवाडी क्रमांक ६९ येथील लहान मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पालिकेचे आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, माजी नगरसेवक सुहास पवार, नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. शीतल कुलकर्णी, अनिता पवार यांच्यासह केंद्राच्या सर्व आरोग्य सेविका तसेच नागरी अंगणवाडीच्या खुर्शीद मुजावर, शीतल शालिनी सोनवले आदी उपस्थित होते.
मुला- मुलींचे आरोग्य चांगले ठेवणे हे मुख्य उद्दीष्ट्य : डॉ. शीतल कुलकर्णी
राष्ट्रीय जंतनाशक मोहीम फेब्रुवारी महिन्याच्या राबविण्यात येत आहे. सुरूवातीपासून राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला- मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा असल्याची माहिती नागरी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. शीतल कुलकर्णी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
4 हजार 877 अंगणवाडी केंद्रांमार्फत केले जाणार वाटप
जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह इतर आरोग्य संस्थांमार्फत तसेच ३ हजार १७६ शासकीय अनुदानित शाळा, ४६१ खासगी शाळा, ७१ तंत्रशिक्षण महाविद्यालये व ४ हजार ८७७ अंगणवाडी केंद्रांमार्फत १ ते १९ वर्ष वयोगटातील ७ लाख १४ हजार बालकांना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.