सातारा प्रतिनिधी । देशात सर्वप्रथम सातारा जिल्हा कारागृहातील बंदी आणि कैद्यांचे ‘आयुष्यमान भारत’ कार्ड व ‘ई-श्रम कार्ड’ काढण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम नुकताच राबविण्यात आला आहे. या उपक्रमासाठी राज्याच्या कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी पुढाकार घेतला आहे.
समता फाउंडेशन, मुंबईचे अध्यक्ष अगरवाल यांच्याशी सातारा कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांनी संपर्क साधला. समता फाउंडेशनकडून कारागृहातील बंदी व कैद्यांचे प्रत्येक महिन्याला त्वचारोग शिबिर व नेत्र शिबिर आयोजित करण्यात येते. त्या संबंधातील आजारांवर औषध उपचार करून विनामूल्य औषधे व चष्मे देखील मोफत वाटप केली जातात. कारागृहातील बंदी व कैद्यांचे आयुष्यमान भारत कार्ड व ई श्रम कार्ड काढण्याचा नवीन उपक्रमास सुरुवात करू शकतो, यावर अगरवाल यांच्याशी चर्चा केली. त्यावर अगरवाल यांनी जराही विलंब न करता सातारा जिल्हा कारागृहातील बंदी व कैदी यांचे आयुष्यमान भारत कार्ड व ई-श्रम कार्ड काढण्यास संमती दिली.
सातारा कारागृहात 18 महिला अंडरट्रायल कैद्यांसह सुमारे 350 कैदी बंद आहेत. तुरुंगात बंद असलेल्यांना आयुष्मान भारत कार्ड देण्यात यावे, यासाठी कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी पुढाकार घेतला आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आतापर्यंत कारागृहातील एकूण 65 जणांचे कार्ड काढून झाले आहे.
महिन्याला अनेक कैदी बाहेर पडतात आणि तुरुंगात प्रवेश करतात. राज्य सरकारच्या कारागृहात असल्याने कारागृहातील कैद्यांचा वैद्यकीय खर्च सरकारकडून केला जातो. हा उपक्रम राज्यातील कारागृहांतील पहिलाच उपक्रम आहे. तसेच हा उपक्रम राज्यभरातील इतर कारागृहांतही राबविला जाणार आहे.
सदर उपक्रमास कारागृह सुरक्षेची काळजी घेवून ज्ञानेश्वर दुबे वरिष्ठ तुरुंग अधिकारी, राजेंद्र भापकर, तुरुंग अधिकारी-1, महेंद्र सोनवणे सुभेदार, मानसिंग बागल सुभेदार, भिसे सुभेदार, दारकु पारधी हवालदार, राजेंद्र शिंदे हवालदार, बर्डे हवालदार, नामदेव खोत हवालदार, दिलीप बोडरे हवालदार तसेच शिपाई प्रतीक्षा पवार, अंकिता करपे, रेश्मा गायकवाड, रूपाली नलवडे, अहमद सन्दे रणजित बर्गे, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दळे, चेतन शहाणे, बालाजी मुंडे यांनी कामकाज पाहिले.
5 लाखांपर्यंत विनामूल्य उपचार मिळण्यास मदत होणार
कारागृहात आलेले बहुतेक कैदी गरीब सतात. कैद्यांना आयुष्मान भारत कार्ड प्रदान केल्यामुळे जामीन मिळवून किंवा शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर गेल्यावरही वैद्यकीय लाभ मिळू शकेल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत साधारण एकूण 1200 आजारांवर 5 लाखांपर्यंत याद्वारे विनामूल्य उपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे सातारा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.