सातारा प्रतिनिधी । अयोध्या येथे दि. 22 जानेवारी रोजी हिंदूच्या अस्मितेचे प्रतीक असलेला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. सुमारे 500 वर्षानंतर हा सुवर्ण दिवस उगवला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. सातारा शहरासह जिह्यातील जनतेने हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा शहरात आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत नागरिकांना घरोघरी जाऊन अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षतांचे वाटप आणि निमंत्रण देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, शेखर मोरे पाटील, विकास गोसावी, धनंजय जांभळे, सचिन तिरोडकर, चंदन घोडके, सचिन भोसले, मुकुंद आफळे, श्रीधर कुलकर्णी, विजय फडके, रवी गायकवाड यांच्यासह आजी- माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वयंसेवक आपल्या घरी अक्षता देण्यासाठी येतील, त्याचा स्विकार करावा. या अक्षता देवासमोर ठेऊन त्यांची रोज पूजा करावी. प्रत्येक मंदिरात २२ जानेवारी रोजी दुपारी ११ ते १ या वेळेत धार्मिक कार्यक्रम घ्यावेत. भजन, कीर्तन, पाठ यामध्ये सामील व्हावे. गोडधोड जेवण करावे. घरासमोर रांगोळी काढावी, घरोघरी दिवे लावावेत, मंदिरे सजवावीत. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. दि. २२ रोजी आपल्याला मिळालेल्या अक्षता थोड्या आपल्या घरातील देव्हाऱ्यात आणि आपल्या जवळच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्तीवर किंवा श्रीरामाच्या फोटोवर वहाव्यात, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले