सातारा प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील मोरणा भागातील मोरगिरी बाजारपेठेत आठवडी बाजार कोठे भरवायचा या कारणावरून दोन गावांतील ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलीस आणि महसूल विभागाने परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
सन १९६६ पासून मोरणा विभागातील पेठशिवापूर ग्रामपंचायत हद्दीत आठवडी बाजार भरला जातो. गेल्या पस्तीस ते चाळीस गावांचा समावेश असणारा हा मोरणा विभाग असून या भागात गुरुवारी आठवडी बाजार भरत असतो. मात्र गेली आठ ते नऊ महिन्यापासून पेठशिवापूर येथील हा बाजार मोरगिरी याठिकाणी भरत आहे वास्तविक नवीन जागेत भरत असलेला हा बाजार पेठशिवापूर ग्रामपंचायत हद्दीतच असला तरी याच कारणावरून मोरगिरी आणि पेठशिवापुर या गावांतील ग्रामस्थांनी शासकीय दरबारी तक्रारी केल्याने या परिसरातील वातावरण तणावग्रस्त राहिले.
दरम्यान गुरुवारी दिवसभर मोरगिरी बाजारपेठेत पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी यांनी ठिय्या मांडून परिस्थिती नियंत्रणात आणली .यामध्ये पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयवंत वाघ, पोलिस निरिक्षक विकास पाडळे, स पो नि कामत, तलाठी, मंडलधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.