पाटण प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसापासून सांगलीतील शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी केली जात आहे. या मागणीचा विचार करता कोयना धरणाच्या आपत्कालिन दरवाजामधून आज सकाळपासून १ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे आता सांगलीसाठी पायथा वीजगृह २१०० आणि १००० असे मिळून ३१०० क्युसेक्स इतके पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.
कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात काही जिल्ह्यात असलेल्या मोठ्या पाणी प्रकल्पातही आता कमी साठा उरला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईच्या समस्येला सामोरे हावे लागणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातही पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले असून गेल्यावर्षी जिल्ह्यात सुरु झालेले टॅंकर अजून बंद न होता सुरूच आहेत. सध्याच्या घडीला सहा तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर एक लाखाहून अधिक नागरिक आणि हजारो पशुधनाची तहान अवलंबून आहे. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठे पाणी प्रकल्प आहेत.
गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाल्याने ही धरणे भरली नाहीत. त्यातच या धरणावर अनेक सिंचन आणि पाणी योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे टंचाई आणि सिंचनाची मागणीमुळे धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. आताही कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी विसर्ग सुरूच आहे. कोयनेच्या पाण्यावरच वीजनिर्मिती तसेच अनेक सिंचन आणि पाणी योजना अवलंबून आहेत. त्यातच साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात कमी पाऊस पडला होता. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी होत होती. त्याप्रमाणे कोयनेतून विसर्ग सुरू करण्यात येत आहे.