कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वरमधील पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावर प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक नागराज मंजुळे ‘खाशाबा’ हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटातून ते खाशाबा जाधव यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग आणि कुस्तीचा थरार दाखवणार आहेत. नागराज मंजुळेंच्या चित्रपटात प्रत्येक कलाकाराला त्यांच्यासोबत काम करायची इच्छा असते. हि संधी मंजुळेंकडून आता दिली जाणार आहे. त्यांनी नुकतीच एक Intragram Post सोशल मीडियात शेअर केली असून त्यातून ईच्छुक कलाकारांना ऑडीशन देण्याचे आवाहन केले आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याकडून चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील महत्वपूर्ण विषयांना हात घातला जातो. त्यांनी बनवलेली प्रत्येक कलाकृती प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते. मंजुळेंच्या सिनेमात काम करण्यासाठी नवोदीत कलाकारांना संधी दिली जात आहे. चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी अनेक अटी घातल्या आहेत. मंजुळेंकडून फक्त मुलांसाठी हि अभिनयाची संधी देण्यात आलेली आहे.
नागराज मंजुळेंनी नुकत्याच सोशल मीडियात शेअर केलेल्या Intragram Post मध्ये लिहिले आहे की, ‘जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित ”खाशाबा”. चित्रपट ऑडिशन. दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे.. फक्त मुलांसाठी.. वयोगट – ७ ते २५ वर्षे.. मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक. पाच फोटो (त्यातील ३ फोटो शरीरयष्टी दाखवणारे).. ३० सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ… ३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ… फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै..’ असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CuOJUBTtaNw/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
नागराज मंजुळे लवकरच कराडला येणार : रणजित जाधव
ज्यांनी भारताला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव माझे वडील होय. त्यांच्या जीवनावर आधारित एखादा चित्रपट निघावा अशी खूप इच्छा होती. त्यासाठी पाच वर्षांपासून आमचे प्रयत्न सुरु होते. पाच वर्षांपूर्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी चर्चा झाली होती. पाच वर्षानंतर त्यांनी चित्रपटाची घोषणा केली. आता चित्रपटावर कामही करण्यास सुरुवात केली आहे. ते येत्या काही दिवसात कराडला येणार आहेत. चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टींची ते यावेळी माहितीही घेणार असल्याचे पैलवान खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
खाशाबा जाधवांच्या आयुष्यवर चित्रपट करणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब : नागराज मंजुळे
ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचं आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदवणाऱ्या अत्यंत प्रतिभावंत पहिलवान खाशाबा जाधवांच्या आयुष्यवर मला चित्रपट करायला मिळतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. फँड्री, सैराट नंतर ‘खाशाबा’ हा माझा तिसरा मराठी चित्रपट असेल जो मी दिग्दर्शित करतोय. जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडेंसोबत ही माझी पहिलीच फिल्म आहे. निखिल साने सर फँड्रीपासून सोबत आहेतच. हा प्रवास नक्कीच रंजक आणि संस्मरणीय असेल…! असे मंजुळे यांनी आपल्या Intragram Post मध्ये म्हंटले आहे.