कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील महत्वपूर्ण अशा तासवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. दिपाली अमित जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. तासवडे हे गाव एमआयडीसी व टोल नाका यामुळे कराड तालुक्यातील महत्वपूर्ण गाव आहे. सन 2021 च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तासवडे ग्रामपंचायतीत सत्तांतर घडून सह्याद्री ग्रामविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली होती.या निवडणुकीत 9 पैकी सात जागा या आघाडीच्या निवडून आल्या होत्या.
या आघाडीचे नेतृत्व अमित जाधव ,राजेंद्र जाधव व विकास जाधव यांनी केले. सदर निवडीच्या कार्यक्रमासाठी मंडल अधिकारी जयराम बोडके यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक समाधान माने, उपसरपंच भीमराव खरात, सदस्य सुभाष जाधव, निवास जाधव , बजरंग गुरव, लता जाधव, भारती शिंदे, अश्विनी जाधव, मनीषा जाधव उपस्थित होते.
गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत तासवडे गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात दुसरे आणी स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुक्यात पहिले असे दोन्ही मिळून 13 लक्ष रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याचसोबत गावातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात लवकरच यश मिळणार असून सध्या ऐंशी टक्के रस्ते सिमेंटचे झाले आहेत. पंधरावा वित्त आयोग, जनसुविधा, समाजकल्याण विभाग आदी योजनेतून विक्रमी अशी सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांची कामे मंजूर होऊन काही कामे पूर्ण झाली आहेत.
सौ.दिपाली जाधव यांच्या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.बाळासाहेब पाटील, माजी खा.श्रीनिवास पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांचेसह युवराज जाधव,अरविंद जाधव, दामोदर खरात, मोहन खरात आदीसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
कराड तालुक्यात एकाचवेळी सख्खे भाऊ – बहीण सरपंच
तासवडे गावच्या सरपंच सौ.दिपाली जाधव या तारुख गावचे लोकनियुक्त सरपंच सचिन कुराडे यांच्या भगिनी आहेत. दोघेही उच्चशिक्षित असून दिपाली या बी.फार्मसी तर सचिन हे इंजिनिअर आहेत. दोघे भाऊ-बहीण एकाचवेळी सरपंचपदी विराजमान झाल्यामुळे त्यांचे राजकीय, सामाजिक व प्रशासकीय स्तरातून कौतुक होत आहे.