सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे आहेत. त्यासह सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील सर्वात महत्वाचा मात्र दुर्लक्षित असलेलया सातारा, सांगली आणि सोलापूर जिह्याच्या सीमारेषेवर असणारा ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. हा तलाव आटण्याच्या मार्गावर असून म्हसवड मध्यम प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या राजेवाडी तलावात आज फक्त उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
राजेवाडी, हिंगणी, पळसावडे येथील शेतीसाठी 300 ते 400 विद्युत मोटारींतून रात्रंदिवस पाणी उपसा सुरू आहे. या पाणी उपशामुळे वन्यप्राणी, पाळीव जनावरे तसेच मत्स्यबीजांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असून, विद्युत मोटारीने होणारा पाणी उपसा तातडीने थांबवावा, अशी मागणी प्राणिमित्रांसह मच्छिमारांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. राजेवाडी तलावाची भिंत सोलापूर जिह्यात येत असली, तरी पाणी साठवण भाग हा सातारा जिह्यात येतो.
तलावानजीक पिलीव घाट डोंगररांग आहे तर पळसावडेनजीक काळा ओढा या दोन्ही परिसरात हरीण, कोल्हे, लांडगे, तरस, सायाळ अशा विविध वन्यप्राणी तसेच पशू, पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. वन्यप्राणी रात्री तलावातील पाणी पिण्यासाठी येत असतात. या ठिकाणी मेंढपाळ जनावरे घेऊन येतात. त्यामुळे तलावातील मृतसाठा आटला तर काय करायचे, हा प्रश्न आहे. त्याचबरोबर देवापूर मच्छीमार व्यावसायिक सहकारी सोसायटी अंतर्गत 175 मच्छीमार व्यावसायिकांच्या तलावातील पाणी उपशामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या पुढे मत्स्यबीज टिकवण्याचे मोठे आवाहन आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विद्युत मोटरीने पाणी उपसा थांबवण्याचे आदेश देऊनही पाणी उपसा सुरूच असल्याचे देवापूर मच्छीमार सोसायटीने तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. सदरचा तलाव हा 1876 मध्ये ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांनी बांधला होता. याची साठवण क्षमता 1.692 टीएमसी असून, या तलावामुळे 44 हजार 208 एकर क्षेत्राला लाभ होतो. तलाव भरल्यानंतर 480 चौरस मैल पाणलोट क्षेत्रामध्ये पाणीच पाणी असते. मात्र, सध्या या तलावातील पाणी आटले आहे.
असा आहे तलावाचा इतिहास…
ब्रिटिश कालीन राणी व्हिक्टोरिया यांनी सुमारे 150 वर्षापूर्वी या तलावाची निर्मिती केली होती सन 2000 पासून सलग दहा वर्षे हा तलाव पाण्याविना ठणठणीत कोरडा पाहायला मिळत होता. 2019 ला अवकाळी पावसामुळे तलाव दहा वर्षातून पूर्ण क्षमतेने भरला 2020 ला ही भरला होता. राजेवाडी तलावाला मोठा दगडी सांडवा आहे. राजेवाडी तलावाचे पात्र सातारा जिल्ह्यात येते सांडवा सांगली जिल्ह्यात येतो तर या तलावातील पाण्याचा बराचसा वापर सोलापूर जिल्ह्यातील गावांना होतो. या तलावाला उजवा व डावा असे दोन कालवे आहेत. राजेवाडी तलाव हा ब्रिटिश कालीन तलाव असल्याने या तलावाची इतिहासात नोंद असून या तलावाची वेगळीच ओळख आहे