आठ तालुक्यातील 5 हजार 951 नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यात साथरोगानी चांगलेच थैमान घातले आहे. अशात जिल्हा गत आठवड्यात हत्तीरोगाचे रुग्ण आढलून आले होते. यानंतर आरोग्य व हिवताप विभागाने हत्तीरोग निर्मूलनासाठी रक्तसंकलन मोहीम सुरु केलेली होती. ती नुकतीच पूर्ण झाली असून या मोहिमेंतर्गत ८ तालुक्यांमधील ५ हजार ९५१ नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. या रक्तातून हत्तीरोगाचे निदान केले जाणार आहे.

नव्याने प्रसार होत असलेला हत्तीरोग हा शरीर विद्रूप करणारा रोग असून, जिल्ह्यात हत्तीरोग बाधित रुग्णांची संख्या ४७ इतकी आहे. या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण’ कार्यक्रमांतर्गत दि. १९ ते २६ जून या कालावधीत हत्तीरोग रुग्ण शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत गावांना भेटी देऊन तेथील कुटुंबाचे रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा, आरोग्य सेवक, आरोग्य सेविकांवर या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

सातारा, कोरेगाव, महाबळेश्वर, खंडाळा, कराड, फलटण, माण व खटाव तालुक्यांतील ५ हजार ९७५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी ५ हजार ९५१ नमुने संकलित करण्यात आले. रात्री ८ ते १२ या वेळेत रक्ताचे नमुने घेण्यात आले. पुणे येथील हत्तीरोग सर्वेक्षण पथकाद्वारे रक्ताची तपासणी करून ८ दिवसात निष्कर्ष काढला जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी महेश पिसाळ, एस. एस. माळवे, राज्य सर्वेक्षण पथकाचे गणेश पारखी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

हत्तीरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम : डॉ. राजेंद्र जाधव

सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यात हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यटन जिल्ह्यातील आठ तालुक्यातील सुमारे सडे पाच हजार नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतले असून त्याची तपासणी केली जात असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

‘या’ वेळेत राबविली जातेय रक्त संकलन मोहीम

ज्या व्यक्तीला हत्तीरोगाची लागण झाली आहे, त्या व्यक्तीच्या रक्तात ‘मायक्रो फायलेरिया’, हे जंतू आढळून येतात. रात्री झोपल्यानंतर रक्ताभिसरण प्रक्रिया सुरू होते. अशावेळी रक्ताचा नमुना घेतल्यास त्या व्यक्तीला हत्तीरोग झाला आहे की नाही, याचे निदान करता येते. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग व हिवताप विभागाकडून जिल्ह्यात रात्री ८ ते १२ या वेळेत रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत.

अशी आहेत हत्तिरोगाची लक्षणे…

थंडी वाजणे, ताप, पाय दुखणे, सुजणे, वृषण आकाराने जाड होणे, पाय हत्तीच्या पायांसारखे जाड व मोठे होणे व हालचाल मंदावणे ही या हत्तीरोगाची लक्षणे आहेत.