सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मधाचे गाव, पुस्तकाचे गाव अशी गावे आपण पाहिली आणि एकली असतील. मात्र, जिल्ह्यात आता असे गाव तयार झाले आहे की त्या ठिकाणी फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातेय. गावातच फळाचे उत्पादन, गावातच त्यावर प्रक्रिया केली जात आहे. ते गाव म्हणजे फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे होय. या ठिकाणी विविध १९ प्रकारची फळबागेची लागवड डोंगर दऱ्याच्या कुशीत वसलेल्या धुमाळवाडी (ता.फलटण) गावात केली जात आहे. कृषी विभागाच्या वतीने ‘फळांचे गाव’ म्हणून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ‘फळांचे गाव’ म्हणून घोषित झालेले धुमाळवाडी हे महाराष्ट्रातील पहिले व एकमेव गाव ठरले आहे.
फलटण तालुक्यातील धुमळवाडी गावात फळबागांसाठी पोषक वातावरण व अनुकूल नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणी १९८५ नंतर डाळिंबाच्या स्वरूपात प्रथमतः फळबागांची लागवड करण्यास सुरुवात झाली. १९९०-९१ नंतर गावातील फळबाग लागवड क्षेत्राने गती घेतली. डाळिंब व धुमाळवाडी हे समीकरण राज्यातच नव्हे तर देशाला परिचित झाले. सुमारे १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे.
फळझाडांना कसा केला जातो पाणीपुरवठा?
धुमाळवाडी गावाजवळून कालवा, पाझर तलाव गेला आहे. तसेच या ठिकाणी बोअरवेल ही आहेत. याच्या माध्यमातून येथील शेतीला व फळबागांना पाणी पुरवठा केला जातो. गावच्या १७१६.८० हेक्टरपैकी १३४५.०४ हेक्टर डोंगराळ भाग आहे. त्यामुळे अवघे ३७१ हेक्टर एवढेच क्षेत्र येथे लागवडीयोग्य आहे. त्यापैकी २५८.७० हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे.
देशभरात डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे धुमाळवाडी गाव…
देशभरात डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेल्या धुमाळवाडी येथे २००० नंतर विविध प्रकारच्या फळपिकांच्या लागवडी खालील क्षेत्रांत वाढ झाली. त्यात पेरू, सीताफळ, डाळिंब, आवळा, चिंच, अंजीर, केळी, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, द्राक्षे, चिकू, लिंबू, संत्री, नारळ, आंबा, पपई या फळबागांचा समावेश आहे.
फळांचा दर्जा, गुणवत्ता व उत्तम चव…
धुमाळवाडी गावातील शेतकऱ्यांनी फळबागेचा लगत असलेल्या बांधावर सफरचंद, काजू, लिची, मोसंबी, फणस, करवंद, बोर खजूर, ब्लॅकबेरी, तुती, स्टार फ्रूट, वॉटर ॲप्पल अशा विविध फळांची लागवड केली आहे. शेतीसाठी कृषी विभागाच्या प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजनेंतर्गत काहींनी स्वखर्चाने ठिबक केले आहे. फळांचा दर्जा, गुणवत्ता व उत्तम चव यामुळे फळांच्या बाजारपेठेत धुमाळवाडीचा लौकिक उंचावला आहे.
थेट बांधावरच केली जाते विक्री…
काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने फळांचे उत्पादन घेत आहेत. येथील उत्पादित फळांची बांधावरच थेट विक्री होते. प्रतिवर्षी फळबागेच्या माध्यमातून येथे सुमारे २५ कोटींची उलाढाल होते. उत्पादित फळांवर प्रक्रिया करून जास्तीतजास्त उत्पन्न मिळण्यासाठी गावातील शेतकरी गटाच्या माध्यमातून तसेच वैयक्तिकरीत्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली अन्नप्रक्रिया युनिटही स्थापन करीत आहेत. या सर्व बाबींची दखल व पाहणी करण्यात येऊन मेगा फूड पार्क, सातारा येथे आयोजित कार्यशाळेमध्ये कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी धुमाळवाडी हे फळांचे गाव म्हणून घोषित केले.
कृषी पर्यटनाला मिळतेय चालना…
धुमाळवाडीला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य, येथील नैसर्गिकरीत्या नऊ कुंड व पाच कुंड असलेला प्रसिद्ध धबधबा असलेल्या फळांचे गाव धुमाळवाडीत पर्यटनाबरोबरीने कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. धुमाळवाडीत २५८ हेक्टर फळबाग आहे. आता हे फळांचे गाव झाल्यामुळे तेथील तरुणांना उत्पादन व उत्पादन प्रक्रिया व निर्यात यासाठी प्रेरणा मिळाली आहे.