सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्याहून सातारा बाजूकडे अथवा महाबळेश्वरला जाण्याचा विचार असेल तर थांबा. कारण आज शुक्रवारी दि. १ डिसेंबर रोजी खंबाटकी घाट मार्गावर धनगर समाजाच्यावतीने रस्ता रोकोचा इशारा देण्यात आला आहे.
धनगर समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांकरीता लोणंद येथे आमरण उपोषणास बसलेल्या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी खंबाटकी घाटामध्ये शुक्रवारी सकाळी ११ पासून रास्ता रोको करणार असल्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला आहे. धनगर समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्याने धनगर बांधवांनी ठाम भूमिका घेतली आहे.
पारंपारिक वेषभूषा करून धनगर बांधव उद्या शेळी-मेंढ्यांसह महामार्गावर उतरण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढणार आहे. लोणंदमधील उपोषणकर्ते गणेश केसकर यांच्या आंदोलनाची शासनाकडून विशेषताः आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी दखल न घेतल्याने धनगर बांधव आक्रमक झाले आहेत.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाकडून कडक बंदोबस्ताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. खंबाटकी घाट मार्गावर आंदोलन होणार असल्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.