कराड प्रतिनिधी । भाजप कराड उत्तरच्या वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेची अतीत येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला. “गेली पंधरा वर्षे कराड उत्तरेत एकच व्यक्ती आमदार आहे. “शंभर टक्के कराड उत्तर विधानसभा मतदार संघ हा भाजपकडे राहणार आहे. कराड उत्तरेत जरी आम्ही तिघे, चौघे इच्छुक असलो तरी ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचे आम्ही सर्वांनी ठरवले आहे. कारण आमचं भांडण हे त्या बिनकामाच्या निष्क्रिय आमदाराच्या विरोधात आहे. या निष्क्रिय आमदाराच्या विरोधात आम्ही सर्वजण एकवटलो असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले.
यावेळी रामकृष्ण वेताळ, कराड उत्तरचे अध्यक्ष शंकरराव शेजवळ काका, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अंजलीताई जाधव, पंचायत समितीचे सदस्य संजय घोरपडे, अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक बजरंगराव, रहिमतपूर पालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश माने, बाबासाहेब यादव, अशोक यादव, शिवचरित्र अभ्यासक आनंदराव जाधव आदींची उपस्थिती होती.
यावेळी धैर्यशील कदम म्हणाले कि, लाडकी बहीण योजनेमुळे माझ्या ताईच्या खात्यावर साडे सात हजार रुपये आले आहेत. त्यांना वर्षाला १८ हजार रुपये मिळणार आहेत. आता यानंतर लाडक्या बहिणी भाजपलाच मत देणार यात शंका नाही. महायुती सरकारने सुरु केलेल्या सर्व योजना या अजूनही सुरु आहेत. त्याचा लाभ हा सर्वांना मिळत आहे. कुठलीही योजना बंद पडलेली नाही. भविष्यकाळात देखील या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. म्हणून आपल्याला विचार करायचा आहे कि आपल्याला कुणाचं सरकार आणायचे आहे. भाजप आणि महायुतीचे सरकार आपण आणल्यास आपल्याला सर्व योजनांचा लभ घेता येईल.
कराड उत्तरमध्ये अडीच वर्षात ४८० कोटींचा रस्ता मंजूर केला
भाजपने अडीच वर्षात कराड उत्तर विधानसभा मतदार सांगता अनेक विकास कामांसाठी निधी मंजूर केले आहेत. अडीच वर्षात ४८० कोटींचा रस्ता देखील मंजूर केला आहे. कोणताही आमदार नसताना हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी म्हटले.
परिवर्तन एकदा धैर्यशील कदम किंवा मनोज घोरपडे करू शकत नाही…
कराड उत्तरेत परिवर्तन हे आपल्याला करायचे आहे त्यासाठी या जनतेने पर्यां करायचे आहे. कारण एकटा धैर्यशील कदम, मनोज घोरपडे परिवर्तन करू शकत नाही तर त्यासाठी कराड उत्तरेतील जनतेने परिवर्तन करायचे आहे. गेल्या ३५ वर्षात जे घडलं ते आपल्याला बदलायचं आहे, असे कदम यांनी यावेळी म्हटले.
अतितकरांनी घेतली कमळाच्या विजयाची शपथ
अतीत येथील मंदिरात झालेल्या भाजप परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत अतीत गावातील ग्रामस्थांनी एक शपथ घेतली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपले हात समोर घेऊन म्हणाले कि, मी शपथ घेतो कि कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील हा नाकारता आणि बिनकामाचा आमदार बदलण्यासाठी व कराड उत्तरमध्ये भाजपचा कमळ चिन्हावरील आमदार निवडून आणण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीन, अशी मी ईश्वर साक्ष शपथ घेत आहे, अशी शपथ यावेळी कदम यांच्या उपस्थित अतीत गावातील ग्रामस्थांनी घेतली.