कराड प्रतिनिधी | भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघात कराड तालुक्यातील पाल येथे महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभास आज उपस्थिती लावली. यावेळी जाहीर सभेत फडणवीस यांनी शरद पवारांनी दिलेल्या मंत्राचा उल्लेख करत निशाणा साधला. “मागच्या काळात राजकाणाबाबत बोलत असताना शरद पवार असं म्हणाले होते की तव्यावरची भाकरी वेळेवर फिरवली नाही तर ती करपते. आता शरद पवारांना सांगा कराडमधली तुमची भाकरी फिरवायची वेळ आली आहे. नाहीतर आमचं उत्तर कराड करपल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शरद पवारांनी दिलेल्या मंत्राप्रमाणे उत्तर कराडकर भाकरी फिरवणार आहेत. मनोजदादाला मुंबईच्या विधानसभेत पोहचवणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
कराड तालुक्यातील पाल येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज जाहीर सभेने झाला. यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, सुरेशतात्या पाटील, कुलदीप अण्णा क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, कराडची भूमी ही ऐतिहासिक आहे. या इतिहासात महाराष्ट्राची जडणघडण आहे. मात्र, मागची २५ वर्षे ज्या विकासाची अपेक्षा ठेवतं, जे परिवर्तन व्हायला हवं तसंच वारंवार लोकप्रतिनिधी पाठवतो. मात्र, कराडमध्ये परिवर्तन होईल. आता सगळ्यांनी मिळून ठरवलं की मनोज दादाला उमेदवारी द्यायची.हा सगळा कृष्णेकाठचा भाग ज्या भागांत अनेक नद्यांचा उगम होतो. ज्या भागाने महाराष्ट्राला पाणीदार केलं अशा ठिकाणीही आपल्याला दुष्काळ दिसतो. २०१४ ते २०१९ या कालावधीत दुष्काळाविरोधात आपल्याला काम करता आलं. सगळ्या योजनांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन दुष्काळी भागांचा चेहरा बदलण्याचं काम आपण केलं.
आज विरोधी पक्षात असतानाही कराड उत्तसाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी आणला. विरोधी पक्षात राहून जर इतका निधी आणला तर कमळ फुलल्यानंतर आपण किती निधी आणू शकतो विचार करा. पाच वर्षांत आपण २५ वर्षांचा बॅकलॉग भरुन काढू. काही कमी पडलं तर उदयन महाराजे आहेत. महाराजांच्या एका म्हणण्यावर मोदीजी तिजोरी खुली करतील तुम्ही चिंताच करु नका, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.