कराड प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उच्यस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी राज्यातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाची स्थिती तसेच कराड विमानतळासह कोल्हापूर, अकोला, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांसाठी भूसंपादन स्थितीबाबत व नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, पुणे रिंग रोड (पूर्व, पश्चिम आणि विस्तार), भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग, नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्गाचा आढावा घेतला. यावेळी “राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांचे तातडीने भूसंपादन करा, कोणतेही प्रकल्प हे लांबणीवर पडू नये यावर भर द्या, भूसंपादनाची कामे निर्धारित वेळेनुसार पूर्ण करा,” असे महत्वाचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईत पार पडलेल्या महत्वाच्या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोणत्याही प्रकल्पाला विलंब होऊ नये. याची सर्वांनी विशेष काळजी घ्यावी. प्रकल्प विलंबनामुळे प्रकल्पाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सर्व विभागांना विशिष्ट वेळापत्रके देण्यात आली आहेत आणि त्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत म्हंटले. अधिकाऱ्यांनी ‘मिशन मोड’मध्ये काम करण्याच्या आणि भूसंपादन तातडीने, गांभीर्याने आणि कार्यक्षमतेने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच या प्रकल्पासाठी वित्त विभागाकडे निधी देण्याची शिफारस करत राज्यातील प्रकल्पाचा आढावा देखील फडणवीस यांनी घेतला आहे.
महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधीचे वाटप
राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित भूसंपादनासाठी ५३,३५४ कोटी रुपयांची तरतूद करण्याची शिफारस मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. तर शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी १२,००० कोटी रुपये देण्याचे निर्देश वित्त विभागाला देण्यात आले आहेत.
कोणकोणत्या प्रकल्पाचा आढावा घेतला?
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडॉर, जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग, पुणे रिंग रोड (पूर्व, पश्चिम आणि विस्तार), भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग, नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग आणि वाढवन-इगतपुरी द्रुतगती महामार्ग त्याचबरोबर वर्धा-नांदेड आणि वर्धा-गडचिरोली या रेल्वे मार्गचा हि आढावा घेतला. तसेच कोल्हापूर, कराड, अकोला, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांसाठी भूसंपादन स्थितीबाबत हि आढावा घेतला.
असा आहे कराड विमानतळाचा विस्तार आराखडा
सातारा जिल्ह्यातील महत्वाता तालुका असलेल्या कराड तालुक्यात कोयना धरण प्रकल्पाच्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १९५५ मध्ये हवाई पट्टी बांधली होती. सध्या विमानतळाचा वापर सामान्य विमान वाहतूक आणि पायलटिंगसाठी केला जातोय. कराड विमानतळाचा मूळ विस्तार आराखडा 2012-13 मध्ये साकारण्यात आला होता. त्याअंतर्गत विद्यमान धावपट्टीची लांबी 1280 मीटरवरून 1700 मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन होते. यासोबतच नाइट लॅडिंगची सुविधा, टर्मिनल बिल्डिंगचा विस्तार, तसेच आधुनिक यंत्रणा बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. राज्य सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये 221.51 कोटींचा निधी मंजूर करत विमानतळाच्या विस्तारीकरणाला गती दिली. या निधीअंतर्गत भूसंपादन, धावपट्टी विस्तार, सुरक्षा भिंती आणि लाइटिंगसारखी मूलभूत कामे केली जाणार आहेत. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भू संपादन व कामांबाबत निर्देश दिले असल्याने कराड विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम सुरु होती.