कराड दक्षिणेतील महत्वाच्या ‘या’ प्रकल्पाला उपमुख्यमंत्र्यांचा ‘ग्रीन सिग्नल’!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । येवती – म्हासोली मध्यम प्रकल्पातून कराड दक्षिणमधील गावांसाठी वितरित केले जाणारे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरित करावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांमधून गेली अनेक वर्षे केली जात होती. भाजपा सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी हा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला असता, त्यांनी या महत्वाकांक्षी बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. या बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पामुळे ओंड, तुळसण, सवादे, म्हासोली, शेळकेवाडी यासह आसपासच्या परिसरातील गावांमधील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध असून, सुमारे ४ हजार एकरहून जास्त क्षेत्र पूर्णत: ओलीताखाली येणार आहे.

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १९९४ साली येवती – म्हासोली मध्यम प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या अंतर्गत दक्षिण मांड नदीच्या तिरावरील येवती येथील धरणातून डाव्या कालव्यातून पाण्याचे वितरण केले जाते. हा डावा कालवा आणि त्याच्या लघुवितरिका बहुतांश डोंगराळ भागातून जातात. शिवाय या कालव्याच्या कामाला सुमारे ३० वर्षे उलटल्याने अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होते. ज्यामुळे शेवटच्या गावापर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने पोहचत नाही.

वास्तविक या धरणातून वर्षातून केवळ २-३ वेळाच पाणी सोडले जाते. त्यातही अनेक ठिकाणी पाणी पाझरत असल्याने व त्याचा अपव्यय होत असल्याने, पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध न झाल्याने या भागातील शेतीसमोर गंभीर संकट उभे राहते. अशावेळी धरणातून होणाऱ्या पाण्याचा पुरवठा बंदिस्त पाईपलाईनद्वारे केल्यास शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी थेटपणे अपव्यव न होता पूर्ण क्षमतेने पोहचू शकते. त्यामुळे याठिकाणी बंदिस्त पाईपलाईन करावी, अशी मागणी अनेक वर्षे ग्रामस्थांतून होत होती.

डॉ. अतुल भोसले यांनी याप्रश्नी पाठपुरावा केल्याने ओंड, तुळसण, सवादे, म्हासोली, शेळकेवाडी यासह आसपासच्या गावांमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. याबद्दल या गावांमधील ग्रामस्थांनी डॉ. अतुल भोसले यांचे अभिनंदन करत, शासनाचे आभार मानले. यावेळी ओंडचे माजी उपसरंपच भीमराव थोरात, भरत थोरात, कृष्णत थोरात, माजी ग्रा.पं. सदस्य भाऊसो थोरात, ॲड. दीपक थोरात, अभिजीत कोठावळे, राजेंद्र थोरात, व्ही. टी. थोरात, सुनील मोरे, सुनील जाधव, इंद्रजीत हणबर, दिलीप जाधव, आबासो सुतार, टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. रेड्डीयार यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

32 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार

या गावातील ग्रामस्थांनी हा प्रश्न भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्याकडे मांडला असतात, डॉ. भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, बंदिस्त पाईपलाईनसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली. या बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पासाठी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालयाकडून सर्व्हेक्षण करण्यात आले असून, याबाबतचे सुमारे ३२ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

4000 एकरहून अधिक जमीन पूर्णत: ओलीताखाली

या निधीला मंजुरी मिळाल्यास हा प्रकल्प ताबडतोब साकारणे शक्य असून, यामुळे या भागातील सुमारे ४००० एकरहून अधिक जमीन पूर्णत: ओलीताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या कामास मंजुरी द्यावी, अशी मागणी डॉ. भोसले यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. याची दखल घेत, उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी प्रशासनास कार्यवाहीचे आदेश दिले असून, येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.