सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील भाजपाच्या पक्ष कार्यालयाच्या इमारतीचं भुमीपूजन शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेली जागा राज्यसभेची जागा अजित पवार गटाला मिळणार असल्याचं स्पष्ट संकेत फडणवीसांनी दिले.
सातारा लोकसभा मतदार संघात उदयनराजे भोसलेंच्या माध्यमातून प्रथमच भाजपचा खासदार निवडून आला. त्यांची राज्यसभेची रिक्त झालेली जागा अजित पवार गटाला मिळेल, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना दिले.
राजधानीत भाजपाला स्वतःचं घर मिळालं
साताऱ्यातील खेड गावच्या हद्दीत भाजपा पक्ष कार्यालयाच्या नियोजित इमारतीच्या भुमीपूजनप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपाला सातारा जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून स्वराज्याच्या राजधानीत स्वतःचं घर मिळत आहे. पक्षाचं कार्यालय किती प्रशस्त, भव्य आहे, यापेक्षा ते किती लोकाभिमुख आणि जनतेला न्याय देणारे आहे, हे अधिक महत्त्वाचे असते, असं फडणवीस म्हणाले.
फाईव्हस्टार व्यापारी संकुलास शासनाकडून मदत करणार
सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उभारण्यात येत असलेल्या फाईव्हस्टार व्यापारी संकुलामुळे कै. अभयसिंहराजे भोसले यांची स्वप्नपुर्ती होणार आहे. संकुलात शेतकरी, व्यापारी, हमाल व ग्राहकांना शेतमाल साठवणुकीसह सर्व सुविधा मिळणार आहेत. संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी आण्णासाहेब पाटलांचं बलिदान
माथाडी नेते दिवंगत आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वात पहिलं बलिदान दिलं, त्यांच्या नावाचं आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ पुनरूज्जीवीत केलं. त्याची जबाबदारी सोपविल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी गावोगाव फिरून मराठा समाजातील तरूणांना उद्योजक बनवल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आजवर साडे आठ हजार कोटींच कर्ज वितरीत केलंय. या महामंडळाच्या माध्यमातून १ लाख उद्योजक तयार झाले. आता ५ लाख उद्योजक तयार करण्याचा दूसरा टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.