सातारा प्रतिनिधी । काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यात त्यांच्या दरे गावी मुक्कामी असून राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू असताना शिंदे अचानक मूळगावी गेल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, शिंदे आजाराची असल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला असून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे. फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाल्यानंतर शिंदे तासाभरात ताऱ्यांकडे आपल्या खासगी हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत.
खासदार श्रीकांत शिंदे दरे गावात दाखल
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या मूळ गाव दरे येथे निवासस्थानी तीन दिवसाच्या मुक्कामासाठी व विश्रांतीसाठी आले असून गावी आल्यानंतर ते आजारी पडले आहेत. त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाला असल्याची माहिती देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल दिली आहे. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिंदे यांच्यासोबत फोनवरून तब्बेतीविषयी विचारपूस केली असून एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच रात्री उशिरा सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेसुद्धा दरे गावात दाखल झाले. श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंसोबतच मुंबईला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे ठाण्यात पोहोचणार असून त्यांच्या उपस्थितीत महायुतीची संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी 5 डिसेंबरला
विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. तर, दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी 1 वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
निर्णयाचा चेंडू काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या पारड्यात
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकूण 57 आमदार निवडून आले आहेत. आता महायुती सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याविषयीचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. दिल्लीहून परतल्यानंतर ते तडक दरे या गावी गेल्यापासूनच त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत. महायुतीच्या नवीन सरकारमध्ये जे महत्त्वपूर्ण भूमिका निभावता येत नसेल तर पुढे काय असा सवाल विचारल्या जात आहे. उपमुख्यमंत्री पद, गृहमंत्री पदसह काही खात्यांवर शिंदे अडून बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता भाजपाने नवीन सरकार कधी स्थापन होणार हे जाहीर करून शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.