कराड दक्षिणमध्ये खा. उदयनराजे भोसलेंच्या स्थानिक विकास निधीतून 1.05 कोटींचा निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून, या माध्यमातून कराड दक्षिणमधील १२ गावांमध्ये विविध प्रकारची विकासकामे साकारली जाणार आहेत.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून विकासकामे मंजूर करावीत, अशी मागणी डॉ. अतुल भोसले यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे केली होती. त्यानुसार खासदार भोसले यांनी १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या माध्यमातून घोगाव येथील श्री बाळसिद्ध मंदिराशेजारी सभामंडप उभारणी (१५ लक्ष), वाठार येथील श्री बिरोबा मंदिराशेजारी सभामंडप सुधारणा (१० लक्ष), अंबवडे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशेजारी सभामंडप बांधणे (१० लक्ष), गोवारे येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारत विस्तारीकरण व सुशोभिकरण करणे (१० लक्ष), जुळेवाडी येथील स्मशानभूमी दाहिनी व शेड बांधणे (१० लक्ष), आटके येथील जाधव मळी येथे स्मशानभूमी दाहिनी व शेड बांधणे (१० लक्ष), मलकापूर येथील आगाशिवनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सुधारणा करणे (१० लक्ष), मालखेड येथील स्मशानभूमी दाहिनी व शेड बांधणे (१० लक्ष), हणमंतवाडी येथील श्री विठलाई मंदिराशेजारी कंपाऊंड वॉल व पेव्हींग ब्लॉक बसविणे (५ लक्ष),

कोळे येथील माळी समाज स्मशानभूमीमध्ये सुधारणा करणे (५ लक्ष), जिंती येथील खोचरेवाडी श्री महादेव मंदिराशेजारी पेव्हर्स ब्लॉक बसविणे (५ लक्ष), घराळवाडी येथे श्री जोतिर्लिंग मंदिराशेजारी पेव्हर्स ब्लॉक बसविणे (५ लक्ष) अशी एकूण १ कोटी ५ लाखांची विकासकामे होणार आहेत. या विकासकामांना लवकरच प्रारंभ केला जाणार असून, यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल संबंधित गावांमधील जनतेकडून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार मानले जात आहेत.