सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत ‘या’ विकासकामांना मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या शक्यतेने सातारा पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय सभेत तब्बल 248 विषयांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभागप्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. विषय पत्रिकेत पायाभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. पायाभूत सुविधांची अंदाजे तीन कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आले.

सातारा पालिकेची प्रशासकीय सभा गेल्या तीन महिन्यापासून पार पडलेली नव्हती. प्रशासकीय मंजुरी आणि विकासकामांच्या निविदांसाठी सभा कधी होणार? याकडे नागरिकांचे लक्ष होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात लागू होण्याची शक्यता असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी प्रशासकीय सभा घेतली.

शिवतीर्थ स्मारक, सोनगाव कचरा डेपोत मियावाकी फॉरेस्ट, कास येथे संरक्षक भिंत, कास धरण सांडव्याच्या रिटेनिंग वॉलचे काम पूर्ण करणे, नळ कनेक्शनसाठी खोदकामांना पूर्वपरवानगी घेणे, वाहतूक नियमानासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमणे, ‘स्वच्छ भारत अभियान 0.2’ अंतर्गत शहर स्वच्छता कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

त्याचप्रमाणे महादरे तलावात दहा एचपीची नवीन मोटार बसवणे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात झालेल्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी, वाढीव भागांमध्ये पायाभूत सुविधांची कामे, ज्या ठिकाणी रस्ते, गटारे मंजूर करण्यात आली आहेत, तेथे वीज खांब उभे करून दिवाबत्तीची सोय करणे, या कामांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामध्ये कोणताही विषय तहकूब करण्यात आला नाही.