सातारा प्रतिनिधी | पुणे-मिरज रेल्वे मार्गावर नवीन रेल्वे टाकण्याबरोबरच रूळ निरीक्षणासाठी देऊर (ता. कोरेगाव) येथील सातारा- लोणंद-पुणे मार्गावरील रेल्वे गेट रविवार, दि. १६ रोजीच्या सकाळी सहा बाजल्यापासून सोमवार, दि. १७ जूनच्या रात्री आठपर्यंत सातारा- लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काढली आहे.
मध्य रेल्वेच्या वाठार स्टेशन येथील लोहमार्ग विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता यांनी देऊर रेल्वे गेटच्या ठिकाणी नवीन रेल्वेरूळ टाकण्याबरोबरच निरीक्षणासाठी सातारा-लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्ग तीन दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव पुणे येथील उपमुख्य स्थापत्य अभियंता यांना केला होता. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार वाहतूक बंद ठेवण्याचा प्रस्ताव सातारा येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केला होता. त्यानुसार वरील अधिसूचना काढण्यात आली आहे.
लोणंद येथून खंडाळा अथवा शिरवळ मार्गे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याकडे येता येणार आहे. वाढे फाटा ते लोणंद अशी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून ती शिरवळ मार्गे लोणंदकडे वळविण्यात आली आहे. फलटण आणि लोणंद येथून साताऱ्याकडे येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने आदर्की फाटा येथील फौजी ढाबा, तडवळे संमत वाघोली, पिंपोडे बुद्रुक, वाघोली, अंबवडे संमत वाघोली मार्गे साताऱ्याकडे वळविण्यात आली आहेत.
सातारा व कोरेगावकडून येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने अंबवडे संमत वाघोली, वाघोली, पिंपोडे बुद्रुक, तडवळे संमत वाघोली मार्गे लोणंद अथवा आदर्की फाटा फौजी ढाबा मार्गे फलटणकडे जातील.
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारांच्या एस.टी. बसेसना अंबवडे संमत वाघोली येथून वाघोली, पिंपोडे बुद्रुक ते वाठार स्टेशन या मार्गावरून जाण्यासाठी आणि येण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचेही पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अधिसूचनेत नमूद केले आहे, याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.