देऊर रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद; अशी राहणार वाहतूक व्यवस्था सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे- मिरज रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ दुरूस्ती व निरीक्षणासाठी देऊर तालुका कोरेगाव येथील सातारा- लोणंद, पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट आज, बुधवार (दि. ३१) व गुरूवार दि. १ ऑगस्टच्या रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढली.

मध्य रेल्वेच्या वाठार स्टेशन येथील उपमुख्य विभागीय अभियंता यांनी देऊर रेल्वे गेटच्या ठिकाणी रेल्वे रूळ दुरूस्ती व निरीक्षणासाठी सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्ग दोन दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव पुणे येथील उपमुख्य स्थापत्य अभियंता यांना सादर केला होता. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार वाहतूक बंद ठेवण्याचा प्रस्ताव सातारा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता.

लोणंद येथून खंडाळा अथवा शिरवळ मार्गे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याकडे येता येणार आहे. वाढे फाटा ते लोणंद अशी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून ती शिरवळ मार्गे लोणंदकडे वळविण्यात आली आहे. फलटण आणि लोणंद येथून साताऱ्याकडे येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने आदर्की फाटा येथील फौजी ढाबा, तडवळे संमत वाघोली, पिंपोडे बुद्रुक, वाघोली, अंबवडे संमत वाघोली मार्गे साताऱ्याकडे वळविण्यात आली आहेत.

सातारा व कोरेगाव कडून येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने अंबवडे संमत वाघोली, वाघोली, पिंपोडे बुद्रुक, तडवळे संमत वाघोली मार्गे लोणंद अथवा आदर्की फाटा फौजी ढाबा मार्गे फलटणकडे जातील. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारांच्या एस.टी. बसेसना अंबवडे संमत वाघोली येथून वाघोली, पिंपोडे बुद्रुक ते वाठार स्टेशन या मार्गावरून जाण्यासाठी आणि येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.