सातारा प्रतिनिधी । पुणे-मिरज रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ दुरुस्ती व निरीक्षणासाठी कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील सातारा-लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा- लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिसूचना पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून बुधवारी काढण्यात आली.
लोणंद येथून खंडाळा अथवा शिरवळ मार्गे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याकडे येता येणार आहे. वाढे फाटा ते लोणंद अशी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून ती शिरवळ मार्गे लोणंदकडे वळविण्यात आली आहे. फलटण आणि लोणंद येथून साताऱ्याकडे येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने आदर्की फाटा येथील फौजी ढाबा,तडवळे संमत वाघोली, पिंपोडे बुद्रुक, वाघोली, अंबवडे संमत वाघोली मार्गे साताऱ्याकडे वळविण्यात आली आहेत.
सातारा व कोरेगावकडून येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने अंबवडे संमत वाघोली, वाघोली, पिंपोडे बुद्रुक, तडवळे संमत वाघोलीमार्गे लोणंद अथवा आदर्की फाटा फौजी ढाबामार्गे फलटणकडे जातील. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारांच्या एसटी बसना अंबवडे संमत वाघोली येथून वाघोली, पिंपोडे बुद्रुक ते वाठार स्टेशन या मार्गावरून जाण्यासाठी आणि येण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचेही पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अधिसूचनेत नमूद केले आहे.
सातारा- लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ज्या-ज्या ठिकाणावरून वळविण्यात आली आहे, त्या सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले असून, आवश्यक तो पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहन चालकांनी आणि वाहन मालकांनी या अधिसूचनेचे पालन करून पोलिस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.