सातारा प्रतिनिधी । वादळी वारा, मुसळधार पावसाची पर्वा न करता शहराच्या पश्चिमेकडील कास परिसरातील शेतकऱ्यांकडून भातशेती केली जाते. दरम्यान, डोंगरमाथ्यावरील भागातील जंगली प्राण्यांकडून भातशेतीचे व नाचणीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. या नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी हतबल झाले असून त्यांनी नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण घातले आहे.
साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील भागात नाचणी व भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. उन्हाळ्यात तरव्याच्या भाजण्या करून मे व जूनमध्ये धूळवाफेला पेरणी केली जाते. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात वाफसा चांगला झाला. अधूनमधून ऊन-पाऊस यामुळे रोपांची वाढ होण्यास पोषक वातावरण आहे. ओढ्यांना पुरेसे पाणी आल्यानंतर महिनाभरात मोठ्या पावसात चिखल करून भात लावणीला सुरुवात होणार आहे. परंतु, रात्रीच्यावेळी भाताच्या, नाचणीच्या वावरात तरव्यांमध्ये केलेली रोपे खाण्यासाठी अनेक जंगली प्राणी येत आहेत.
साळिंदर, ससे, रानगवे, रानडुक्कर आदींकडून रात्री वावरात येऊन रोपांची नासधूस केली जात आहेत. त्यामुळे संरक्षणासाठी झडपी ठोकडा, बुजगावण्यासारख्या अनेक उपाययोजना शेतकरी करत आहेत. काहीजण रात्री रानात ओरडून जनावरांना हाकलत आहेत. काही दिवसानंतर भात लावणीला प्रारंभ झाल्यावर भाताच्या रोपांचा तुटवडा भासणार आहे. यामुळे शेती लावणीअभावी पडून राहून आर्थिक झळ बसणार आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी सोसायटीचे पीक कर्ज घेतले असल्याने पीक विम्याचे संरक्षण मिळण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
भात लावणीसाठी दोन ठिकाणी तरव्यातून भाताची रोपे तयार केली. परंतु, मंगळवारी रात्री या दोन्ही ठिकाणी रानडुकरांच्या कळपाने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर भाताचा वाफसा खाऊन तुडवून नासधूस केली असल्याने भात लावणीसाठी रोपांची कमतरता भासणार आहे. तसेच झालेली नुकसानभरपाई मिळावी.