जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्र वाढूनही योग्य दर मिळेना; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्रात दरवर्षी वाढ होत असून यंदा तब्बल ९६ हजार हेक्टरवर पीक उत्पादन निघाल्याने सोयाबीनचे उत्पादन वाढले आहे. मात्र, अजूनही दर हमीभावापेक्षाही कमी असल्यामुळे सोयाबीनमागची साडेसाती संपणार कधी? असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा असतो. सातारा, कराड, कोरेगाव, खटाव या तालुक्यात सोयाबीन पीक अधिक घेण्यात येते. पण, मागील दोन वर्षांच्या काळात माण, फलटण या तालुक्यातही सोयाबीनची पेरणी होऊ लागली आहे. यावर्षी खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आलेले, पण चांगल्या पावसामुळे ३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.

त्यातच जिल्ह्यात खरिपातच सोयाबीन पीक घेण्यात येते. यावर्षीही सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्र वाढत असले तरी दर मात्र कमीच आहेत. सध्या तर क्विंटलला चार हजारांच्या घरातच दर आहे. यामुळे शेतकऱ्यांची दराकडून निराशा होत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत असून अनेक शेतकरी चांगला दर मिळत नसल्याने पर्याय शोधत आहेत.

जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती हेक्टर सोयाबीनची पेरणी?

जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आलेले. पण, प्रत्यक्षात ९६ हजार ६६ हेक्टरवर पेर झालेली. सातारा तालुक्यात २१ हजार हेक्टरवर सोयाबीन होते. जावळीत ५ हजार ३२२ हेक्टरवर पीक होते. पाटण तालुक्यात सर्वसाधारण ८ हजार ९०० हेक्टर क्षेत्र होते. मात्र, तालुक्यात ९ हजार ७८५ हेक्टरवर सोयाबीन घेण्यात आलेले. कराड तालुक्यात ९ हजार तर कोरेगाव तालुक्यातही १४ हजार हेक्टरवर पेरणी झालेली.

अडीच वर्षांपूर्वी सोयाबीनला क्विंटलला १० हजारांचा दर

जिल्ह्यात अडीच वर्षांपूर्वी सोयाबीनला क्विंटलला १० हजारांवर दर आला होता. मात्र, गेल्या दीड वर्षापासून सोयाबीनला दर कमी मिळत आहे. सातारा बाजार समितीत तर सध्या ४ हजार २०० च्या दरम्यान भाव आहे. त्यातच केंद्र शासनाने यावर्षीही सोयाबीनचा हमीभाव वाढवून ४ हजार ८९२ रुपये केला आहे. तरीही हमीभावापेक्षा सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत निराशा आहे.

नाफेडची हमीभावाने खरेदी केंद्रे

शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तसेच जिल्ह्यात सहा ठिकाणी केंद्रे सुरू झाली आहेत.

खटाव तालुक्यात दुप्पट क्षेत्र

खटाव तालुक्यात सोयाबीन क्षेत्रात जवळपास दुप्पट वाढ झाली होती. ५ हजार ७९१ हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात १२ हजार हेक्टरवर सोयाबीन होते. माणमध्येही सोयाबीनला सुरुवात झाली आहे. यावर्षी २७२ हेक्टर क्षेत्र होते. फलटणमध्ये १ हजार १५० तर वाई तालुक्यात ६ हजार ८२० हेक्टरवर पीक घेण्यात आलेले.