सातारा प्रतिनिधी | खंडाळा येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक ऊर्मिला अशोक गलांडे (वय ४७, रा. समर्थ प्लाझा, पुणे) व युवा रोजगार कौशल्य योजनेतील कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी ऊर्फ साक्षी शिवाजी उमाप (वय २८, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांच्यावर मंगळवारी साताऱ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून धडक कारवाई करत ७५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. त्यांच्यावर खंडाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत या विभागाच्या पोलिस अधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिलेली माहिती अशी, की लोणंद (ता. खंडाळा) येथील सिटी सर्व्हे नंबर १७७/४२८ चे क्षेत्रफळ १८१.४० चौरस मीटर या मिळकतीवर चुकून लागलेला सत्ता प्रकार ‘ब’ कमी करून मिळण्याबाबत वाई येथील प्रांताधिकाऱ्यांना लेखी अर्ज सादर केला होता. त्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार कार्यालय खंडाळा येथे पाठविला.
तहसील कार्यालय खंडाळा यांनी चौकशीसाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, खंडाळा येथे चौकशी व अभिप्रायाकरिता पाठविला होता. दरम्यान, उपअधीक्षक (भूमी अभिलेख) श्रीमती ऊर्मिला गलांडे यांनी तक्रारदार यांच्या मिळकतीवरील सत्ता प्रकार ‘ब’ कमी करून सत्ता प्रकार ‘अ’ करण्यासाठी चौकशी अहवाल देण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेवटी ७५ हजार रुपये लाचेची रक्कम ही कार्यालयातील कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी ऊर्फ साक्षी शिवाजी उमाप यांच्याकडे देण्यास सांगितले.
कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी ऊर्फ साक्षी उमाप यांनी उपअधीक्षक गलांडे यांच्या सांगण्यावरून तक्रारदारांकडून लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सापळा पथकाचे प्रमुख पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलिस हवालदार नितीन गोगावले, पोलिस विक्रमसिंह कणसे, स्नेहल गुरव व अजित देवकर यांनी ही कारवाई केली.