सातारा प्रतिनिधी । ठेकेदाराकडून कामांची मंजुरी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना, कोरेगाव उपविभाग कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता मदन रामदास कडाळे (वय 46 रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. सध्या रा. तामजाईनगर सातारा) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात कडाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मदन कडाळे हा कोरेगाव उपविभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातून त्याची कोरेगावात नियुक्ती झाली होती. तक्रारदार हे नोंदणीकृत ठेकेदार असून, त्यांची स्वतःची फर्म आहे. ते विद्यु त पोल उभारणे आणि विद्युत कनेक्शन देणे, याची कामे करतात.
त्यांनी घेतलेल्या तीन कामांपैकी सुरुवातीच्या कामाचे व नव्याने जमा केलेल्या दोन कामांना मंजुरी देण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच कडाळे यांनी मागितली होती. मंगळवारी दुपारी आर. एम. देसाई पेट्रो ल पंपाशेजारी असलेल्या महावितरण कंपनीच्या उपविभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला.
ठेकेदाराने पैसे देत असताना इशारा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कडाळे याला रंगेहाथ पकडले व रक्कम जप्त केली. लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर मदन कडाळे याला तत्काळ कोरेगाव पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिनियमानुसार रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कडाळे याला सातारा येथील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले.