सातारा प्रतिनिधी | कामगारांच्या वैद्यकीय तपासणी बिलाच्या रकमेसाठी तीस टक्क्यानुसार प्रमाणक शल्यचिकित्सकाकडून १७ हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील कामगार विभागाच्या उपसंचालकाला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. नंदकिशोर आबासाहेब देशमुख, असे संशयिताचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे प्रमाणक शल्यचिकित्सक आहेत. त्यांनी सातारा एमआयडीसीतील दोन कंपन्यांमधील कामगारांची वैद्यकीय तपासणी केली होती. त्याचे एकूण बील ५८,४०० रुपये झाले होते. बिलाच्या ३० टक्के प्रमाणे १७ रुपयांची मागणी लोकसेवक नंदकिशोर देशमुख यांनी तक्रारदाराकडे केली होती.
तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या पडताळणीत कामगार विभागाच्या उपसंचालकाने १७ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. शल्यचिकित्सकाकडून १७ हजार रुपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कामगार उपसंचालकाला सापळा रचून रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.