सातारा प्रतिनिधी । सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात असलेल्या मनुष्यबळासाठी राज्य शासनाकडून पाठपुरावा सुरु आहे. आवश्यक पदांच्या भरती प्रक्रियेची मोहीम पुढील महिन्यात राबवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनुष्यबळाचा प्रश्न सुटेल, अशी महत्वाची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सातारा जिल्हा रुग्णालयाच्या 15 वॉर्डसह बाह्य रुग्ण विभागाचा काल डॉ. राधाकिसन पवार यांनी राऊंड घेतला. यावेळी रुग्णांशी चर्चा करून त्यांना मिळणाऱ्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. राऊंडनंतर झालेल्या आढावा बैठकीतही त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाच्या सविस्तर सूचना केल्या. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या एकूणच कामकाजाची डॉ. पवार यांनी पाहणी केली. डॉ. पवार यांनी यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम केले आहे. आरोग्य उपसंचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही जिल्हा रुग्णालयाची तिसरी भेट होती.
जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्णविभागात त्यांनी काल सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासमवेत वॉर्डचा राऊंड घेतला. तसेच आयुष विभाग, प्रसुती कक्ष, सिटीस्कॅन यंत्रणा, राष्ट्रीय तंबाखू निवारण कार्यक्रम, एनएसडीसी अशा विविध उपक्रमांची सुद्धा त्यांनी माहिती घेतली. डॉ. पवार यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. रुग्णालयातील सुविधांची सविस्तर माहिती घेतली.
जिल्हा रुग्णालयाच्या भुयारी गटार योजनेसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्याची निविदा निघाली आहे. या प्रक्रियेची सुद्धा डॉ. पवार यांनी माहिती घेऊन यासंदर्भात प्रशासकीय कामकाजाच्या सविस्तर सूचना केल्या. तसेच रुग्णालयातील इतर अडचणी विशेषतः वैद्यकीय अधिकारी वर्ग एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी व अतिरिक्त मनुष्यबळाच्या संदर्भात त्यांच्याशी संपर्क केला असता राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. आवश्यक पदांच्या भरती प्रक्रियेची मोहीम पुढील महिन्यात राबवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनुष्यबळाचा प्रश्न सुटेल, असे त्यांनी सांगितले.