सातारा प्रतिनिधी | राज्यातील जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या पालकमंत्रीपदाबाबत शनिवारी सरकारकडून घोषणा करण्यात आली. एकूण जिल्ह्यांपैकी बहुतांश जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आले. दरम्यान, पालकमंत्रीपद वाटपावरून महायुतीत शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे पहायला मिळत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा आहे.
नाराज झाले एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी दरे येथे रविवारी आले आहेत. दरम्यान, नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी देखील ते आपल्या गावी गेले होते. आता देखील ते आपल्या मुळगावी गेले असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, महायुती मधील प्रमुख नेत्यांकडे महत्वाच्या जिल्ह्याची पालक मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.
काही तासात रायगड अन् नाशिकचे पालकमंत्रीपद रद्द
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नाही. त्यामुळे नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासांनंतरच अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.