उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सातारा दौऱ्यावर; कार्यकर्ते होणार चार्ज?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा उद्या दिनांक 9 रोजी सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते कोणता कानमंत्र देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे राजकीय मैत्रीत्व जगजाहीर आहे. तुम्हीच महाराष्ट्राच्या टीमचे कॅप्टन अशी थेट घोषणा फडणवीस यांनी मागील एका कार्यक्रमात केली होती.

आता आगामी महिन्याभरामध्ये विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा कार्यकारणीमधील अंतर्गत खदखद अजूनही संपलेली नाही. माणचे आ. जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात त्यांच्यावर सातत्याने विरोधकांकडून राजकीय हल्ले होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचा मुहूर्त साधून साताऱ्यात येत आहेत.

यावेळी तीन कार्यक्रमाचे नारळ फुटणार आहेत. भारतीय जनता पार्टीने जय जवान हाऊसिंग सोसायटीमध्ये 42 गुंठे जागा भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयासाठी राखीव ठेवली होती. या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा नारळ फुटणार आहे. त्यानंतर प्रतापसिंह शेती शाळेसमोरील मोकळ्या जागेमध्ये नवीन प्रांत आणि तहसीलदार कार्यालय उभारणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने प्रस्तावित आहे त्याही कार्यक्रमाचा नारळ ऑनलाईन फुटणार आहे.

शिवराज पेट्रोल पंप नजीक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन कार्यालयाचा इमारतीचा नारळ फडणवीस यांच्या हस्ते फुटणार असून त्यानंतर सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा होणार आहे.

या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत भाजपच्या जिल्हा कार्यकारणीने तीन हजार मंडल आणि बूथ प्रमुखांची आढावा बैठक नुकतीच पूर्ण केली आहे. तसेच राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा प्रतिसाद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आगामी सातारा जिल्हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे