कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभर महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत कराडला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. 22) सकाळी 11 वाजता कराड येथे भव्य लाभार्थी संमेलन व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस बुधवारी (ता. 21) रात्री कराड येथे मुक्कामी येणार आहेत. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. 22) सकाळी 10 वाजता कराड येथील शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने व्यापक चर्चा होणार आहे.
यानंतर सकाळी 11 वाजता कराड येथील कल्याणी ग्राऊंडवर भव्य लाभार्थी संमेलन व जाहीर सभा होणार असून, या सभेला उपमुख्यमंत्री फडणवीस संबोधित करणार आहेत. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भरत पाटील, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, मदन भोसले, मनोज घोरपडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या लाभार्थी संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे.