सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने सर्वच पक्ष वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. दुसऱ्या पक्षातील नेते कार्यकर्ते आपल्या पक्षात कसे येतील याची मोर्चे बांधणी सध्या त्या त्या पक्षातून केली जात आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रविवारी (दि. २४) रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते व मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माणचे जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश सोहळा होणार आहे.
तसेच माजी आ. आनंदराव पाटील यांचे पुतणे व कराड शेती उत्पन बाजार समितीचे माजी उपसभापती सुनिल पाटील हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उद्या पक्षप्रवेश करणार आहेत.
सातारा जिल्ह्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (दि.२४) रोजी दुपारी २ वाजता दहिवडी बाजार पटांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनिल देसाई हे त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.