शेणोली रेल्वे स्टेशन जवळच्या बोगद्यातील रस्त्याची दयनीय अवस्था; निवडणूक प्रशासनाकडून ठेकेदारास कारवाईचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण मतदार संघातील संजयनगर मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी शेणोली रेल्वे बोगद्याखालील रस्त्याने निघालेल्या भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक निरीक्षक व त्यांच्या प्रशासकीय फौजफाट्यास रस्त्याच्या प्रचंड गैरसोयीमुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. याबाबत प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरून रेल्वेच्या ठेकेदाराने काम सुरू केल्याचा बनाव करत या रस्त्यावर मुरूम टाकत नुसती मलमपट्टी केल्याने वाहनधारकांबरोबर प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान येत्या आठवड्यात रेल्वेच्या संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुक होत असून यादरम्यान शेणोली स्टेशन बोगद्याखालून अनेकवेळा ऑब्झर्वर, मतदान अधिकारी, कर्मचारी ये-जा करणार आहेत तसेच कर्मचाऱ्यांसह मतदान पेट्या घेऊन एस.टी बस  जाणार आहे. छोटी वाहने व बस  जाण्यासारखी सद्य परिस्थिती या रस्त्याची अजिबात नाही.  या रस्त्यावर साचलेले पाणी व पडलेले भले मोठे खड्डे, रस्त्यातून वर आलेले स्टीलचे बार यामुळे वाहने पंक्चर होऊन  अपघात होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून चांगल्या दर्जाचे  काम निवडणुक तारखेपूर्वी पूर्ण करून घ्यावे. अशी समज प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. बोगद्यानजीक असलेल्या मोठ्या खड्ड्यात साचलेले पाणी पाझरून बोगद्यात जमा होत असल्याने व हा खड्डा रेल्वेच्या हद्दीत असल्याने रेल्वे प्रशासनातर्फे आधी हा खड्डा बुजवावा.

संजयनगर ग्रामस्थांनी पाठपुरावा करून वारंवार वस्तूस्थिती मांडल्याने रेल्वे प्रशासनाने बोगद्यातील रस्त्याची दुरुस्ती केल्याचा नुसता बनाव केला आहे. मात्र सर्व समस्या तशाच आहेत. बोगद्यात रस्ता समान पातळीत नाही. त्यावर पुन्हा सांडपाणी साचत आहे. ज्या कारणासाठी दुरुस्ती हाती घेतली, तेच काम रेल्वे प्रशासनाने मलमपट्टी स्वरूपात केले आहे. त्यामुळे तेथील समस्या पुन्हा ये रे माझ्या मागल्या च्या अवस्थेत आहेत. बोगद्यात अवजड वाहने अडकत आहेत. नुकताच तेथे दुचाकीचा अपघातही झाला आहे, त्यामुळे लाखो रुपये खर्चुनही परिस्थिती जैसे थे असल्याने रेल्वे खात्याच्या  कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का ? असा प्रश्न  वाहनधारकांसह प्रशासनाने उपस्थित केला आहे.

काम रेल्वे खात्याच्या ठेकेदाराकडूनच होणे अपेक्षित

अपघात घडू नयेत, वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत या रस्त्याची तात्पुरती डागडूजी स्थानिकांनी केली. परंतु रेल्वे यंत्रणेची केबल रस्त्याखालून गेल्याने त्यास धक्का पोहोचून यंत्रणा  बंद पडू नये म्हणून सदरचे काम चांगल्या पद्धतीचे रेल्वे खात्याच्या ठेकेदाराकडूनच होणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.