जिल्ह्यात डेंग्यूचा वाढतोय धोका; डासांची उत्पत्ती रोखणे आवश्यक, आरोग्य यंत्रणा झाली अलर्ट

0
179
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाऊस पडतो. यंदाही चांगला पाऊस पडत आहे. पाऊस पडल्यानंतर डबके, पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते. यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि घराजवळ पाणी साचण्याच्या जागा नष्ट कराव्यात, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले आहेत. मागील आठवड्यात 55 जण डेंग्यूने रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर आरोग्य विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.

डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती या डासापासून होतो. आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण, जनजागृती मोहीम, औषध फवारणी व डास नियंत्रणासाठी विशेष पथके काम करत आहेत. शहरांसह ग्रामीण भागात ही मोहीम राबविली जात आहे. शहर परिसरात प्रदूषण वाढत असून डासांचे प्रमाणही अधिक वाढल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यात मागील आठव्यात आरोग्य विभागाकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सध्या डेंग्यूचे 55, हिवतापचे 33, चिकनगुण्याचे 17 रुग्ण आढळून आले होते. ज्या ठिकाणी डेंग्यूसह अन्य रुग्ण सापडले आहेत तेथील ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या मदतीने धूर फवारणी करण्यात येत आहेत. तसेच घरोघरी हिवताप कार्यालयामार्फत सर्व्हेही करण्यात येत आहे.

डेंग्यूपासून असा करा बचाव

घरात किंवा परिसरात पाणी साचू देऊ नये, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, म्हणजेच पाणी साठलेल्या सर्व वस्तू रिकाम्या करा, कूलर, फुलदाण्या, पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

डासांचा डंख का वाढतो ?

डासांचा डंख थांबविण्यासाठी स्वच्छता ठेवावी, घरात किंवा घराभोवती पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. साचलेले पाणी, उघडी भांडी, टाक्यांतील पाणी वेळोवेळी बदलत राहावे.

जिल्ह्याची परिस्थिती काय?

जिल्ह्यात शहरी भागातील वस्त्यांमध्ये डासांची संख्या वाढली असून, आरोग्य विभाग सर्वेक्षण करत आहे. सुदैवाने अजून रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र, आता पाऊस जोरात असून पाणी साचल्यामुळे डासांची देखील उत्पत्ती होत आहे.

ताप अंगावर काढू नका

पावसाळ्यात डेंग्यू होण्याची शक्यता अधिक असते. तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव, चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेटसची संख्या कमी होणे, वारंवार उलट्या होणे, श्वास घेताना त्रास होणे यासह ताप आल्यास तो अंगावर काढू नये.

6 महिन्यात 1 हजार 421 जणांच्या रक्त नमुने तपासणी

सातारा जिल्ह्यात जानेवारी ते जून दरम्यान 1 हजार 421 जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागामार्फत घेण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 402 जणांचे रक्त नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये शहरी व ग्रामीण भागात हिवतापांचे 33 रुग्ण, डेंग्यूचे 77 तर, चिकुनगुन्याचे 17 रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागामार्फत संबंधित ठिकाणी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत तसेच रुग्णावर आरोग्य विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.

डेंग्यूची लक्षणे…

अचानक थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, हाडं, सांध्यामध्ये वेदना, मळमळ, अंगावर सूज व चट्टे येणे, तापासोबतच रक्तस्त्राव होण्याचा धोका, शरीरावर पुरळ, नाकातून किंवा हिरड्यामधून रक्तस्त्राव, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडणे, सतत तहान लागणे, अशक्तपणा, गंभीर स्थितीत रुग्णांच्या मेंदू, फुफ्फुसं किंवा किडणीवर परिणाम आदी लक्षणे आढळून येतात.