सातारा प्रतिनिधी । पावसाळा सुरुवात झाली कि तसेच वाट वातावरण बदलामुळे साथरोग आजार उध्दभवण्याची शक्यता जास्त असते. अशात आरोग्य यंत्रणांकडून खबरदारी घेतली जाते. साथरोग नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप विभागाने देखील सातारा शहरात घरोघरी आरोग्य तपासणीची मोहीम व सर्व्हेचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार गत आठ दिवसांत तब्बल 220 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. सर्व्हेसाठी 8 आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांंकडून डेंग्यू अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्ट केल्या जात आहेत.
सातारा जिल्हा परिषद व हिवताप विभागाकडून दरषर्वी मलेरिया, डेंग्यू, क्षयरोग, चिकनगुनिया अशा आजारांचा गृहभेटीद्वारे सर्व्हे केला जातो. पावसाळा सुरू झाल्यापासून सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले असून सातारा शहरात हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शहरातील सदर बझार, लक्ष्मीटेकडी, करंजे, प्रतापगंज, केसरकर पेठ, माची पेठ आदी भागात सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. यासर्व्हेसाठी आठ आरोग्य सेवकांकडून घर व परिसरातील पाण्याचे कंटेनर तपासले जात आहेत.
दि. 6 ते 13 जुलै या कालावधीत पथकाकडून शहरातील 1 हजार 780 घरांना भेट देण्यात आली. या घरांमधील पाण्याचे पिंप, फ्रीज, एसी, भंगार साहित्य आदींची तपासणी केली असता 220 घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. या अळ्या नष्ट करण्यात येत असून, पाण्याची पिंपेही रिकामी करण्यात आली आहेत. डेंग्यू अळ्यांचा शोध घेण्याबरोबरच ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोळ्यांभोवती जळजळ, अशक्तपणा अशी लक्षणे असलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नुमनेही तपासणीसाठी घेतले जात आहेत.
हिवताप विभागाने आठवडाभर काय केले?
- 1780 घरांना भेटी
- 220 घरांत डेंग्यूच्या अळ्या
- 34,510 पाण्याची पिंपे तपासली
- 220 पिंपे रिकामी केली
- 100 पिंपात ॲबेटिंग
- 35 नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतले