सातारा प्रतिनिधी | अजिंक्यतारा कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापन वेगवेगळ्या योजना, ऊस पीक उत्पादन वाढीसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन सातत्याने करत असते. अजिंक्यतारा शेतकऱ्यांची सर्वार्थाने काळजी घेणारा एकमेव कारखाना आहे, असे मत पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील माती व पाणी चिकित्सालयाचे व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी व्यक्त केले.
शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कारखाना कार्यक्षेत्रातील ६१६ शेतकऱ्यांच्या शेतावर पर्यावरणपूरक खोडवा ऊस व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक राबवण्यात आले. त्यासंदर्भात कार्यस्थळावर ऊस पीक शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरणपूरक खोडवा उसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादन वाढ या संदर्भात डॉ. फाळके, पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रातील कीड व रोग शास्त्रज्ञ डॉ. सूरज नलावडे, जिल्हा बँकेचे कृषी अधिकारी अमृत भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हाइस चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह सर्व संचालक आणि अधिकारी उपस्थित होते. ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणातील बदल जाणून घेऊन शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे.
उसाचे उत्पादन कमी होते आणि खर्च वाढतो, अशी ओरड आपण ऐकतो. अनियमित ऊस लागवड, दुर्लक्षित लागवड तंत्रज्ञान, जमिनीचे बिघडलेले आरोग्य याचा सारासार विचार करून असे प्रकार घडू नयेत याची काळजी घेतली पाहिजे. अमर्यादित पाणी वापर कटाक्षाने टाळला पाहिजे. शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतच वापरली गेली पाहिजे, असे डॉ. फाळके यांनी सांगितले. ऊस पिकावरील विविध प्रकराची कीड, रोग आणि त्यासाठीचे नियंत्रण, औषध फवारणी तसेच पिकाची घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. सूरज नलावडे यांनी मार्गदर्शन केले. शेती अधिकारी विलास पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.