साताऱ्यातील पोवई नाक्यावर मराठा क्रांती मोर्चातर्फे निदर्शने; रास्ता रोको करत घोषणाबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे सातारा जिल्ह्यातही असंतोषाचा भडका उडाला आहे. या घटनेचा निषेध करीत सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी शनिवारी तीव्र आंदोलने करण्यात आली. दरम्यान, सातारा येथील पोवई नाक्यावर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विवेकानंद बाबर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी
‘मिंधे सरकार’ विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, सोमवारी (दि. 4 रोजी) ‘खटाव बंद’ची हाक देण्यात आली आहे.

सातारा येथील पोवई नाक्यावर करण्यात आलेल्या आंदोलनावेळी शरद काटकर, बापू क्षीरसागर यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कराडमध्ये तर मराठा मोर्चाचे संघटक अनिल घराळ यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’ करण्यात आला.

पाटण येथील लायब्ररी चौकात मराठा क्रांती मोर्चाचे पाटण तालुका संघटक यशवंत जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर, संजय इंगवले, रामभाऊ पवार, दीपक पाटणकर सहभागी झाले होते.

फलटणमधील डेक्कन चौकात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माउली सावंत यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच सोमवारी (4 रोजी) ‘खटाव बंद’ची हाक देण्यात आली आहे.