महाकुंभमेळ्यासाठी विशेष गाडीला सांगली, कराडसह किर्लोस्करवाडीत थांबा मंजूर; भाविकांना उत्सवात सहभागी होण्याची संधी

0
26

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव

जगातला सर्वात मोठा धार्मिक सोहळा प्रयागराजच्या (Prayagraj) संगमावर सुरु झाला आहे. 4 हजार हेक्टर जमिनीवर महाकुंभचा मेळा (Mahakumbh Mela) आयोजित झाला आहे. दरम्यान, या महाकुंभ मेळ्यासाठी 13 हजार विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) सुरु केलेल्या कुंभमेळा विशेष बळी-प्रयागराज-तुंडला व तुंडला-प्रयागराज-हुबळी रेल्वे गाड्यांना सांगली (Sangli), किर्लोस्करवाडी (Kirloskarwadi) व कराड (Karad) या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे कुंभमेळ्याला जाणे भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे. जाण्यासाठी दोन व परतीसाठी दोन अशा ४ गाड्या या मार्गावर धावणार आहेत.

मध्य रेल्वेकडून ज्यावेळी ही विशेष गाडीची घोषणा करण्यात आली. त्यावेळी सांगली, किर्लोस्करवाडी व कराड या तिन्ही स्थानकांना थांबा देण्यात आला नव्हता. प्रवाशी संघटनांकडून थांबा देण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली. त्यानंतर संघटनाच्या मागणीची दखल मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घेतली. दुपारी गुरुवारी याबाबतचे नवे परिपत्रक काढून तिन्ही महत्त्वाच्या स्थानकांना थांबा देण्यात आला. त्यामुळे सांगली, किर्लोस्करवाडी येथून प्रयागराजला जाण्यासाठी ही विशेष गाडी उपलब्ध झाली असून भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या स्थानकावर किती वाजता येणार?

हुबळी-प्रयागराज-तुंडला विशेष एक्सप्रेस (गाडी क्र. ०७३७९) २० जानेवारीला हुबळीहून सुटेल. सांगली स्थानकावर सकाळी ८.५० वाजता पोहचणार आहे. त्यानंतर किर्लोस्करवाडीत सकाळी ९.२३ वाजता तर कराडला सकाळी ९.५७ ला पोहचणार आहे. प्रयागराजला ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६:३५ पोहोचेल.

गाडी क्र. ०७३८१ : हुबळी-प्रयागराज-तुंडला विशेष एक्सप्रेस ६ फेब्रुवारी रोजी हुबळीहून सुटेल. निश्चित वेळेत ती सांगली, किर्लोस्करवाडी व कराड स्थानकावर येईल.

गाडी क्र. ०७३८० : तुंडला-प्रयागराज-हुबळी एक्सप्रेस २४ जानेवारीला प्रयागराजहून पहाटे १ वा सुटेल. २५ जानेवारीला कराडला सकाळी १०.५७, किर्लोस्करवाडीत सकाळी ११.२८ला तर सांगलीत सकाळी ११.५७ ला पोहचेल.

गाडी क्र. ०७३८२ : तुंडला-प्रयागराज-हुबळी १० फेब्रुवारी राेजी प्रयागराजहून पहाटे १ वा सुटेल. दुसऱ्या दिवशी निश्चित वेळेत कराड, किर्लोस्करवाडी व सांगलीला थांबेल.

विशेष रेल्वे गाडीची प्रवाशांनी लाभ घ्यावा : गोपाल तिवारी

कराड, सांगली, किर्लोस्करवाडी येथून बसणाऱ्या प्रवाशांनी प्रयागराजला जाताना रेल्वे तिकिटावर बोर्डिंग स्टेशन सांगली, किर्लोस्करवाडी किंवा कराड टाकावे. प्रयागराजहून परत येताना तिकिटावर प्रवासाचे शेवटचे स्टेशन सांगली, कराड किंवा किर्लोस्करवाडी टाकावे जेणे करून या याठिकाणी गाडी थांबण्याच्या सूचना मिळतील. प्रवासी संघटना आणि मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वेकडून सांगली, किर्लोस्करवाडी आणि कराड रेल्वे स्थानकास या विशेष गाडीच्या थांब्यास मंजुरी देण्यात आली. याबद्दल मध्य रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया मध्य रेलवे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

असा असणार विशेष रेल्वे गाडीचा परतीचा प्रवास

जाताना ही गाडी पुणे, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूरमार्गे प्रयागराज जाईल. येताना जबलपूर, इटारसी, भुसावळ, मनमाड, पुणेमार्गे सांगलीला येईल व सांगलीतून पुढे हुबळीला जाईल.

34 स्थानकावर थांबे

या सर्व गाड्यांना एकूण ३४ स्थानकावर थांबे देण्यात आले असून सविस्तर थांबे पाहण्यासाठी प्रवाशांना आयआरसीटीसी संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲप्लिकेशवर पाहता येईल. तिकिटेही ऑनलाईन बुकिंग करता येतील.