सातारा प्रतिनिधी | औंध उपसा सिंचन योजनेंतर्गत औंध पाणी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, सचिव नार्वेकर यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले. यावेळी औंधसह 21 गावांचा पाणीप्रश्न त्वरित मार्गी लावणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी आ. जयकुमार गोरे, अध्यक्ष संतोष मांडवे, उपाध्यक्ष धनाजी आमले, डॉ, विवेक देशमुख, जयवंत मांडवे, शिवाजी गायकवाड, हणमंत चव्हाण उपस्थित होते.
मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माण-खटाव तालुक्यातील एकही गाव पाण्याविना वंचित ठेवणार नसून त्या दृष्टीने सर्व पाणी योजनांची कामे धडाक्यात सुरु आहेत. औंधसह 21 गावांची योजना नवीन असल्यामुळे माझी सही होऊन ती फाईल राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. औंधसह 21 गावांची प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आहे. औंध पाणी योजनेबाबत कोणतेही प्रयत्न न करता काही विरोधक दिशाभूलीचे राजकारण करत आहेत. या योजनेसाठी पाण्याची उपलब्धतता झाली आहे. अनेक वर्षे सत्ताधार्यांची पाठराखण करुनही विरोधकांना जे शक्य झाले नाही ते शक्य होत आहे. यामध्ये आ. जयकुमार गोरे यांची प्रचंड मेहनत व पाठपुरावा असल्याचेही ना. फडणवीस म्हणाले.